संग्रहित फोटो
इचलकरंजी : इचलकरंजी शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी उघड्यावर विक्री करण्यात येत असलेल्या मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रीवर महापालिका प्रशासनाने बंदी घातली आहे. परिणामी शहरातील विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून चिकन ६५, चिकन, बिर्याणी, मटण आदी मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रीचे हातगाडे बंद ठेवण्यात आले आहेत. महापालीका आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिलेल्या आदेशानंतर अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या नेतृत्वाखाली याबाबतची कार्यवाही केली आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. लहान मुलांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्याचे पडसाद दोन दिवसांपूर्वी महापालिकेत उमटले होते. विविध राजकीय पक्ष, संघटनांनी आंदोलन करीत भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली होती. तर निर्बिजीकरण मोहिमेत खंड पडल्याच्या कारणास्तव आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांच्यासह मुख्य स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळ यांना कारणे दाखवा नोटीस काढली होती. प्रशासकीय पातळीवर याबाबतची कृती सुरू केली असली तरी भटक्या कुत्र्यांचा हिंस्त्रपणा रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक असताना उघड्यावर विक्री करण्यात येत असलेल्या मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रीवर बंदी घालण्याचा फतवा महापालिका प्रशासनाने काढला आहे.
टाकाऊ पदार्थ आणि कुत्र्यांचा वावर
मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर मोठा असतो. या ठिकाणी टाकाऊ मांसाहारी पदार्थ भटक्या कुत्र्यांना घातले जातात. असे पदार्थ न मिळाल्यास भटकी कुत्री आक्रमक होतात. यातूनच नागरिकांवर विशेषतः लहान मुलांवर हल्ला करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत आहे. यापूर्वीही विक्रेत्यांना महापालिका प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांना टाकाऊ मांसाहार पदार्थ न घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मांसाहार खाद्यपदार्थांची विक्री बंद
महापालिक आयुक्त पल्लवी पाटील यांनी तोंडी आदेश दिल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन पथकाने मांसाहार खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या हातगाड्या न लावण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शहरातील जनता चौक, शाहू पुतळा यासह डेक्कनसह मुख्य मार्गावरील अनेक ठिकाणी उघड्यावर होणारी मांसाहारी खाद्यपदार्थांची विक्री बंद झाली आहे. सांयकाळी सात वाजल्यानंतर मुख्य मार्गावर अनेक अशा प्रकारचे हातगाडे रात्री उशिरा पर्यंत सुरू असतात.
हे सुद्धा वाचा : पुण्यातील धनकवडीत गळफास लावून महिलेची आत्महत्या; कारण…
मुख्यमार्गासह अनेक ठिकाणी वावर
शहरात टोळक्यांनी कुत्र्यांचा वावर असतो. मांसाहार खाद्यपदार्थांची विक्री केल्या जाणाऱ्या ठिकाणी कुत्र्यांचा वावर मोठा असतो. मुख्यमार्गासह अनेक ठिकाणी कुत्र्यांची टोळी सायंकाळनंतर रस्त्यावर येते. रात्री दहा नंतर एकट्याला चालत फिरणे तर मुश्किलच आहे. पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना कुत्र्यांची मोठी भीती आहे.