भुसावळ : लोहमार्ग आणि रेल्वे सुरक्षा बल पोलिसांनी दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून भुसावळात 29 तर मनमाडमध्ये 30 अल्पवयीन मुलांची (Child Trafficking) होणारी तस्करी रोखली होती. यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली. अटकेतील आरोपी मौलाना मो. अंजर आलम मो. सय्यद अली (बिहार, ह. मु. सांगली) याला भुसावळ रेल्वे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता या तस्करीतील बालकांचा ताबा त्यांच्या पालकांकडे देणार असल्याचे सांगितले जात आहे.
दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून मुलांची तस्करी केली जात असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास मोहीम हाती घेतली. त्यामध्ये पोलिसांनी तस्करीप्रकरणी आरोपीला अटक केली. या तस्करीसाठी नेण्यात येणाऱ्या मुलांच्या जन्मतारखा एकसारख्या असल्याने अधिक तपास करायचा असल्याचे सांगून सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायालयाने यातील आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पालकांनी पाठवले स्वखुशीने
यामध्ये संशयिताचे वकील इस्माईल शेख, फिरोज शेख, एहतेश्याम मलिक, वसीम खान, अॅड. मिर्झा आलम यांनी ही मानवी तस्करी नाही, संबंधित मुले आरक्षित तिकिटावरून दानापूर एक्स्प्रेसने शिक्षणार्थ मदरशामध्ये निघाली होती. या मुलांची, त्यांच्या पालकांची कुठलीही तक्रार नाही. मुलांच्या पालकांनी यंत्रणेला स्वखुशीने मुलांना मदरशामध्ये शिक्षणार्थ पाठवत असल्याचे लिहून दिल्याने पुन्हा पोलिस कोठडीची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद संशयित केला. न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी दिली आहे.