सौजन्य - नवराष्ट्र टीम
मंचर : आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी आठव्यांदा विजय मिळवला. त्यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स गावोगावी लागले आहेत. मात्र आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे लावलेल्या ‘त्या’ फ्लेक्सची चर्चा सध्या सर्वत्र जोरात सुरु आहे. या फ्लेक्सवर ‘साहेब… गाव पुढारी बदला’ असा मजकुर छापण्यात आला आहे.
आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यात सरळ लढत झाली. यामध्ये वळसे पाटील यांनी विजय मिळवला. परंतु यावेळी वळसे पाटील यांना मताधिक्य कमी मिळाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वळसे -पाटील यांना ६६ हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते. परंतु यावेळी मताधिक्यात मोठी घट झाली, वळसे पाटील हे १५२३ मतांनी निवडून आले. मताधिक्य का घटले? याचीच चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. त्यातच पारगाव येथे दिलीप वळसे पाटील यांच्या अभिनंदनाचे अनेक फ्लेक्स लागले आहेत. त्यामध्ये एक फ्लेक्स मात्र लक्ष वेधून घेत आहे. त्या फ्लेक्सवरील मजकूराची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. त्यावर वळसे पाटील यांचे अभिनंदन केले आहे. परंतू त्याखाली ‘साहेब… उभा आंबेगाव शिरूर पाहतोय आशेने, आता बदल घडवा गतीने…’ त्याखाली ‘साहेब… गाव पुढारी बदला… साहेब पुढारी बदला…’ असा मजकुर फ्लेक्सवर आहे. या मजकुराची चर्चा सध्या मतदार संघात जोरात सुरु आहे.
हे सुद्धा वाचा : बस चालकाचा महिलेच्या दागिन्यांवर डल्ला; कोल्हापूर बसस्थानकातील प्रकार
कमी मताधिक्याला स्थानिक पुढारीच जबाबदार
दिलीप वळसे पाटील यांच्या मताधिक्यात घट झाली. त्यामुळे मतदार संघातील गावागावातील नेते – पुढारी कमी पडले आहे. परिणामी मताधिक्य घटले, अशीही चर्चा सध्या आहे. वळसे पाटील यांनी अनेक गावांमधील पुढाऱ्यांना तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, शरद सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ अशा अनेक संस्थांवर विविध पदे दिलेली आहेत. परंतू तरी देखील वळसे पाटील यांना मताधिक्य कमीच मिळाले आहे. याला जबाबदार स्थानिक पुढारीच आहेत, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. त्यामुळे संबंधित गावपुढारी हे जबाबदारी स्विकारणार का? याबाबत उत्सुकता आहे.
महाराष्ट्र निकालाचा आकडा
महाराष्ट्र निकालाचा अंतिम आकडा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महाराष्ट्रात 288 पैकी 132 जागांवर भाजपला यश आलं आहे. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यश मिळालं आहे. शिंदे गटाला 57 जागांवर यश मिळालं आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे महायुतीचा आकडा हा 240 वर पोहोचला आहे. सत्ता स्थापनेसाठी 145 जागांवर निवडून येणं आवश्यक आहे. पण महायुतीला त्यापेक्षाही जास्त 95 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे.