संग्रहित फोटो
शिवनगर : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार दिनांक २१ मे ते २७ मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तर २२ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी प्रकाश अष्टेकर आणि माळेगावचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २१ ते २७ मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तसेच २८ मे रोजी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी केली जाईल. २९ मे ते १२ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. १३ जून रोजी अंतिम उमेदवारी यादी जाहीर केली जाणार असून दिनांक २२ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. दिनांक २४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
दिलजमाई करणार की?
माळेगाव कारखाना ऊसाला चांगला भाव देणारा साखर कारखाना म्हणून ओळखला जात आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने माळेगाव कारखान्याची सत्ता हस्तगत केली होती. कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे यांच्या नेतृत्वाखालील सत्ता प्रस्थागत करण्यात आली होती. मात्र सध्या हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दिलजमाई करणार का? असा सवाल व्यक्त केला जात आहे.
नेत्यांवर निवडणुकीचे चित्र अवलंबून
दरम्यान माळेगाव कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो, मात्र चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे हे दोन्ही नेते कोणती भूमिका घेणार, यावर या कारखान्याच्या निवडणुकीचे सर्व चित्र अवलंबून आहे.






