बारामती/अमोल तोरणे : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारी निश्चित करण्यावरून सुरू असलेला घोळ अखेर मिटला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक या तीन नेत्यांची दिलजमाई कायम राहिली असून, सर्वपक्षीय असलेल्या श्री जय भवानी माता पॅनलच्या उमेदवारांची यादी राष्ट्रवादीचे नेते किरण गुजर व राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी जाहीर केली. यामध्ये पृथ्वीराज जाचक व माजी कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक पाटील वगळता अन्य सर्व नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र या यादीमुळे कारखाना कार्यक्षेत्रात अनेक इच्छुकांना संधी न मिळाल्याने त्यांच्यामध्ये मोठी नाराजी पसरली आहे.
छत्रपती कारखान्याच्या हितासाठी कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी या तिन्ही नेत्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याची भावना देखील अनेक सभासदांनी व्यक्त केली. श्री जय भवानी माता पॅनेल मध्ये कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व शरद शिवाजी जामदार यांना लासुरने येथील गट क्रमांक एक मधून उमेदवारी देण्यात आली आहे. सणसर या महत्त्वाचे असलल्या गट क्रमांक दोन मध्ये भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रामचंद्र विनायकराव निंबाळकर व शिवाजी रामराव निंबाळकर यांना संधी देण्यात आली आहे. या गटामध्ये इच्छुकांची मोठी संख्या होती. गट क्र ३ उद्धट या गटातून पृथ्वीराज श्रीनिवास घोलप, गणपत सोपान कदम यांना, गट क्र ४ अंथूर्णे या गटातून विठ्ठल पांडुरंग शिंगाडे, प्रशांत दासा दराडे, अजित हरिश्चंद्र नरुटे यांना, गट क्र ५ सोनगाव या गटातून अनिल सिताराम काटे, बाळासाहेब बापूराव कोळेकर, संतोष शिवाजी मासाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
गट क्र ६ गुणवडी या गटातून कैलास रामचंद्र गावडे, सतीश बापूराव देवकाते, निलेश दत्तात्रय टिळेकर यांना, ब वर्ग सहकारी उत्पादक,बिगर उत्पादक संस्था व पणन मधून कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोक संभाजीराव पाटील यांना, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून मंथन बबनराव कांबळे यांना, महिला राखीव प्रतिनिधी मधून माधुरी सागर राजपुरे, सुचिता सचिन सपकळ यांना, इतर मागास प्रवर्गातून तानाजी ज्ञानदेव शिंदे यांना , भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रवर्गातून योगेश बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर छत्रपती कारखान्याच्या हितासाठी आपण पृथ्वीराज जाचक यांना पाच वर्ष अध्यक्षपदाची संधी देणार असून, ही निवडणूक बिनविरोध अथवा एकतर्फी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. विरोधी गटाकडून पॅनेलची बांधणी करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. मात्र श्री जय भवानी माता पॅनल मध्ये इच्छुकांची मोठी संख्या असल्याने उमेदवारी न मिळाल्याने नाराजांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व पृथ्वीराज जाधव यांच्यापुढे आहे. अनेक नवख्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील जुने नेते मोठ्या प्रमाणावर नाराज झाले असल्याचे बोलले जात असून, त्यांची नाराजी अजित पवार कशा पद्धतीने दूर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.