संग्रहित फोटो
सासवड /संभाजी महामुनी : सासवड नगरपरिषद सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूकीचे चित्र दिवसेंदिवस रंगतदार होत चालले आहे. अनेक इच्छुकांनी स्वतःहूनच आपली उमेदवारी जाहीर केली असून, प्रचार यंत्रणा स्वतंत्रपणे राबविण्यास सुरुवातही केली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी यंत्रणा कामाला लावली असली तरी यामध्ये सद्यस्थितीत भाजपने मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे. त्यात नगराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक तयार झाले असल्याने या पदासाठी भाजपमधून अधिकृत उमेदवारी कोणाला मिळणार ? याकडे लक्ष लागले आहे.
नगरपरिषदेचा कार्यकाल संपल्यानंतर जवळपास चार वर्षानंतर निवडणूक जाहीर झाली आहे. जवळपास एक पंचवार्षिक निवडणुकीचा कालावधी वाया गेला असून एवढ्या दीर्घ कालावधीत सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमणात कार्यकर्ते, नेते तयार झाले आहेत. ” अभी नही तो कभी नही ” म्हणत कार्यकर्त्यांनी स्वतःहूनच निवडणुकीची तयारी केली आहे. परिणामी इच्छुकांची प्रचंड संख्या वाढली आहे. निवडणुक अर्ज दाखल करण्यास येत्या काही दिवसात प्रत्यक्ष सुरुवात होणार असून, कोणाला थांबवायचे आणि कोणाला उमेदवारी द्यायची याची चाचपणी सुरु झाली आहे. यामध्ये उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या भाजपमध्ये प्रचंड असल्याने उमेदवारी जाहीर करताना माजी आमदार आणि भाजप नेते संजय जगताप यांना मात्र कसरत करावी लागणार अशी चिन्हे दिसत आहेत.
जगताप यांची होणार दमछाक
माजी आमदार संजय जगताप यांनी काही महिन्यापूर्वीच कॉंग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी पुरंदर तालुक्यातील जवळपास सर्वच नेते, कार्यकर्ते यांना भाजपमध्ये विलीन करून घेतले आहे. मात्र तालुक्यात भाजपची सत्ता नसतानाही पक्ष जिवंत ठेवणे आणि पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनीही जोरदार तयारी केली आहे. तसेच सोबत आलेले नेते, कार्यकर्ते यांच्यामध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणाला उमेदवारी जाहीर करायची आणि कोणाला नाही याचा निर्णय घेण्यासाठी नव्या जुन्यांचा मेळ घालताना संजय जगताप यांची दमछाक होणार असे दिसत आहे.
सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास होणार सुरुवात
सासवड नगरपरिषद निवडणुकीसाठी सोमवार दिनांक १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. १७ नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून २१ ते २५ नव्हेंबर पर्यंत अर्ज माघारी घेणे आणि २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी लगेचच निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान अर्ज माघारी घेतल्यापासून केवळ सातच दिवस शिल्लक असल्याने एवढ्या कमी कालावधीत प्रचार करताना उमेदवारांची मात्र चांगलीच दमछाक होणार आहे. यापूर्वी सोशेल मिडिया फारशी सक्रीय नव्हती मात्र यावेळी सोशेल मिडीयाचा मोठा प्रभाव जाणवणार असल्याने प्रभागामधील वर्षानुवर्षांच्या विविध समस्यांना कशा प्रकारे तोंड देणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.
११ प्रभागामधून २२ नगरसेवकांची होणार निवड
सासवड नगरपरिषदेचे एकूण ११ प्रभाग असून, यामध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण २२ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. निवडणुकीसाठी एकूण ३३, ६५६ इतके मतदार असून ३६ मतदान केंद्रे आहेत त्याचप्रमाणे नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने निवडणूक अधिकारी, कर्मचारी जोराने तयारीला लागले आहेत.






