संग्रहित फोटो
पुणे/अक्षय फाटक : देशभरात पुणे वाहतूक कोंडीत चौथ्या स्थानावर असल्याचा दावा ‘टॉमटॉम’ संस्थेने अहवालात केल्यानंतर पुणे पोलिसांनी गेल्या वर्षभरात केलेल्या उपाययोजना आणि त्यावर झालेला बदलानुसार शहरातील वाहतूक सुधारली असल्याचा दावा तर केला परंतु, गर्दीत अडकण्याच्या ठिकाणांमध्ये ८ ने घट झाली आहे. त्यासोबतच सोलापूर-पुणे रस्त्यावर वाहन संख्येत वाढ होऊन देखील तेथील कोंडी सुरळीत असल्याचे म्हटले आहे. आगामी काळात आणखी आवश्यक त्या उपाययोजना करून वाहतूक सुरळीत होईल, असा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. परिणामी शहरात पावसाळ्यात देखील यंदा वाहतूक कोंडीच्या नावाने बोंबा-बोंब झाली नाही.
‘टॉमटॉम’ या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार शहर वाहतूक कोंडीत जगात चौथ्या आणि देशात तिसर्या स्थानावर असल्याचे म्हटले. या संदर्भात पुणे पोलिसांनी शहरातील वाहतूकीबाबत नुकतीच माहिती दिली आहे. शहरात मेट्रो, उड्डाणपुल आणि इतर विकासकामे सुरू आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यास सप्टेंबरपासून महापालिका व वाहतूक पोलीस समन्वयातून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करत आहेत. शहरातील ८० टक्के वाहतूक ही प्रमुख ३२ रस्त्यांवरून होते. या प्रमुख रस्त्यांवर सुधारणा करण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महापालिका प्रशासनाला पत्र लिहिले होते. त्यानुसार प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी कमी करणे यासह सुरक्षिततेच्या दृष्टीने कामे करण्यात येत आहेत.
खराब रस्ते, खड्ड्यांची दुरुस्ती, अतिक्रमण व नो-पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ‘मिशन-१५’ मोहिमेत १५ रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. त्यात सोलापूर रस्त्यावर चांगला परिणाम दिसून येत आहे. लवकरच नगर रस्त्यासह इतर रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. वर्षभरात ११० तास लागत होते, आता १०८ तास लागत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शहरातील वाहतुक कोंडीत अडकण्याची ठिकाणे २०२३ च्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात सरासरी ३७ होती. त्यात २०२४ च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात ८ ठिकाणांनी घट होऊन ती ठिकाणे २९ वर आली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात २०१८ मध्ये वाहनांची संख्या ५२ लाख होती. ती गेल्या ५ वर्षांत ७२ लाख इतकी झाली. मागील पाच वर्षांत सुमारे २० लाख वाहने वाढली असून, रस्त्यांची वहन क्षमता तेवढीच आहे. तथापि महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या समन्वयातून प्रमुख रस्त्यांवर उपाययोजना करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येत सुधारणा होत आहे. महापालिका आणि वाहतूक शाखेच्या प्रयत्नांतून पुढील वर्षभरात वाहतूक कोंडी आणखी कमी होईल.
वाहतूक पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने सोलापूर रस्त्यावरील भैरोबानाला चौक, गोळीबार मैदान, वैदवाडी, सोपानबाग आणि रवीदर्शन चौक या महत्त्वाच्या चौकातील वाहतुकीत बदल केला. चौक अपवाद वगळता सिग्नल मुक्त झाले असल्याने येथील बहुतांशी कोंडी सुटल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथील वाहनांची संख्या वाढल्याचे दिसून येते. सोलापूर रस्त्यावरून दरदिवशी सरासरी दीड लाख वाहनांची वाहतूक होते.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांची दहशत; येरवड्यात एकाला चाकूच्या धाकाने लुटले
वाहतूक पोलिसांनी प्रत्येक चौकातून ये-जा केलेल्या वाहनांची स्वतंत्र नोंद ठेवली त्यामध्ये सोपानबाग आणि रवीदर्शन चौकातील वाहने सर्वाधिक वाढल्याचे दिसून आले. सोपानबाग येथून ऑगस्ट महिन्यात ३२ लाख १७ हजार ७२६ वाहने गेली होती. तर, डिसेंबरमध्ये ५४ लाख ९४ हजार २०३ वाहने सोपानबाग येथून मार्गस्थ झाली होती. त्यानंतर रवीदर्शन चौकातील वाहनांत वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये रवीदर्शन चौकातून १५ लाख ३८ हजार ९५५ वाहनांची वाहतूक झाली होती. डिसेंबरमध्ये तेथेच २९ लाख ९० हजार १२३ वाहने मार्गस्थ झाली.