लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर सर्व सत्ताधारी पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. मात्र काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून अनेक मतभेद निर्माण झाले होते. पण अखेर आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. या नेत्यांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उमेदवारांची नावे घोषित केली. अखेर आज महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटला आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ महाविकास आघाडीतील उमेदवारांची आज नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये शिवसेना २१, राष्ट्रवादी काँग्रेस १० आणि काँग्रेस १७ जागांवर निवडणूक लढणार आहे. तसेच आज महाविकास आघाडीतील फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. मात्र तरीसुद्धा सांगली, भिवंडीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. या पत्रकार परिषदेला नाना पटोले, उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. तसेच सांगली, भिवंडी आणि मुंबईसाठी अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे या जागांवर कोणता घटक पक्ष निवडणुकीत आपला उमेदवार उतरवेल याची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली जाईल.
महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळालेल्या जागा
नंदूरबार,धुळे ,अकोला,अमरावती,नागपूर ,भंडारा-गोंदिया,गडचिरोली-चिमूर ,चंद्रपूर,नांदेड, जालना,मुंबई उत्तर, मध्य उत्तर मुंबई ,सोलापूर ,कोल्हापूर रामटेक येथे काँग्रेसला १७ जागा मिळाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा
बारामती,शिरुर,सातारा,भिवंडी,दिंडोरी,माढा,रावेर,वर्धा,अहमदनगर दक्षिण,बीड या १० जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत.
शिवसेना ठाकरे गटाच्या जागा
दक्षिण मुंबई,दक्षिण मध्य मुंबई ,उत्तर पश्चिम मुंबई,मुंबई ईशान्य ,जळगाव ,परभणी,नाशिक ,पालघर ,कल्याण,ठाणे,रायगड ,मावळ ,धाराशीव ,रत्नागिरी, बुलढाणा,हातकणांगले,संभाजीनगर,शिर्डी ,सांगली ,हिंगोली ,यवतमाळ,वाशिम या जागा शिवसेनेला देण्यात आल्या आहेत.
आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीतील उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, आजच्या गुढी पाडवाच्या शुभ मुहूर्तावर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होत आहेत. अनेक प्रमुख नेते उपस्थित आहेत. आजचा वातावरण प्रसन्न आहे. नाना पटोले मान हलवताय, काँग्रेस नेत्यांचे आनंदी चेहरे पाहताय, पवार साहेबांचा प्रसन्न चेहरा बघतोय, असे संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.