पिंपरी : ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका दुचाकीस्वाराने एका व्यक्तीला चाकूने भोकसले. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी प्रसूनधाम सोसायटी समोरील रोडवर थेरगाव येथे घडली. सुरेश सुतार असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा मुलगा ओंकार सुरेश सुतार (वय २५, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निलेश राजिवडे (वय ३३, रा. भूमकर वस्ती, हिंजवडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील सुरेश हे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता थेरगाव येथून दुचाकीवरून जात होते. प्रसूनधाम सोसायटीसमोर आल्यानंतर आरोपी त्याच्या दुचाकीवरून जात असताना सुरेश यांच्या दुचाकीला तो ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू लागला. ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून आरोपी आणि सुरेश यांचे भांडण झाले. त्यातून आरोपीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने सुरेश यांच्या पोटात तीन ते चार वेळा भोकसले. तसेच हातावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.