संग्रहित फोटो
पुणे : वानवडी परिसरातील फातिमानगर येथे हत्याराच्या धाकाने मारहाण करत एका प्रवाशाला रिक्षाचालकाने लुटल्याची घटना मंगळवारी (दि.27) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली आहे. फातीमानगर येथील भैरोबा नाल्याजवळ ही घटना घडली आहे. याप्रकरणी फुलचंद गोविंद राठोड (वय ३७, रा.वारजे माळवाडी) यांनी वानवडी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रिक्षा चालक किसन सुरेश नुया (वय ३२, रा. स्वारगेट) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तक्रारदार राठोड हे स्वारगेटकडे आरोपी नुया याच्या रिक्षातून निघाले होते. मात्र, चालकाने त्यांना स्वारगेट येथे न सोडता रिक्षा फातीमानगर येथील भैरोबानाला परिसरात एएफएमसी बस स्टॉपजवळ आणली. रिक्षाचालकाने त्याच्याकडील छोट्या हत्याराचा धाक दाखवून तक्रारदार यांना हाताने मारहाण केली. तसेच त्यांचे कपडे फाडले. नंतर जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. तसेच पॅन्टच्या खिशात हात घालून साडेतीन हजार रुपये काढून घेतले. दरम्यान, त्यांनी वानवडी पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून रिक्षाचालकाला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
महिलेची सोनसाखळी हिसकावली
रस्त्याने पायी चालत निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरट्याने पोबारा केला आहे. खडकी येथील एल्फिन्स्टन रोडवर बुधवारी (दि. २८ मे) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत खडकी बाजार येथील ६५ वर्षीय महिलेने खडकी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बुधवारी सायंकाळी एल्फिन्स्टन रोडवरून घरी निघाल्या होत्या. फॅड्रीक्स बंगल्यासमोर आल्या असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ४५ हजारांची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकवली. त्यानंतर चोरटा तिथून पळून गेला.