संग्रहित फोटो
बारामती/ अमोल तोरणे : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील श्री भवानी माता पॅनेलमध्ये इच्छुकांची मोठी संख्या असल्याने उमेदवारी निश्चित करण्यावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यातच कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी १ मे रोजी कारखान्याच्या निवडणुकीसाठी पॅनेल घोषित करणार असल्याचे जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यामध्ये बिघाडी होण्याची शक्यता असून ही बिघाडी झाल्यास तिरंगी लढतीची शक्यता आहे.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत २ मे रोजी आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री भवानी माता पॅनेलच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती स्वतः गेल्या आठवड्यात बारामती मध्ये घेतल्या. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक हे स्वतः होते. छत्रपती साखर कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी जाचक यांना पाच वर्ष अध्यक्षपदाची धुरा सोपवणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले आहे. त्यानुसार एकत्रितपणे निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी उपमुख्यमंत्री पवार व भरणे यांच्यासह जाचक हे तिघे नेते करत आहेत. या पॅनलमध्ये तब्बल ४०० हून अधिक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. मात्र उमेदवारी निश्चित करण्यावरून या तीन नेत्यांमध्ये अद्यापही एक वाक्यता होत नसल्याचे दिसून येत आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दोन दिवस उरले असतानाही उमेदवारांची यादी अद्याप निश्चित केली गेली नाही. मात्र संभाव्य यादी वरून रुसवे फुगवे झाले असल्याचे बोलले जात आहे. पृथ्वीराज जाचक यांनी लासुर्णे या ठिकाणी आपल्या समर्थकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत जाचक यांनी आपण एक मे रोजी पॅनल जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पवार व जाचक मनोमिलनामध्ये बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान दुसरीकडे भाजप नेते तानाजी थोरात यांनी छत्रपती कारखाना वाचवण्यासाठी आपण स्वतंत्रपणे पॅनल उभा करून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज जाचक यांचे नाव जाहीर केल्यानंतर कारखाना वाचवण्यासाठी जाचक यांच्यासारख्या उत्तम प्रशासकाची गरज असल्याचे मत व्यक्त करत उपमुख्यमंत्री पवार यांच्या निर्णयाचे स्वागत केले होते. छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत राजकारण बाजूला ठेवून कारखान्याच्या हितासाठी सर्वच नेत्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून योग्य भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे मत सभासद व्यक्त करत आहेत. सध्या कारखान्याची परिस्थिती दयनीय झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वच नेत्यांनी दोन पावले मागे सरून योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.