कल्याण : खासदार श्रीकांत शिदे यांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी कार्य अहवाल प्रकाशित होणार आहे. सोशल मिडियावर या कार्यक्रमांसंदर्भातील बॅनरची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे. या बॅनरवर राज ठाकरे सह महायुतीतील सर्व नेत्यांचा फोटो आहे. मात्र मनसेकडून मनसे आमदार राजू पाटील यांची समन्वयक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांचा फोटो नाही. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
कल्याण लोकसभेतून खासदार शिंदे हे तिसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उभे ठाकले आहे. त्यांच्याकडून जोरदार प्रचार सुरु आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर या निवडणूक लढवणार आहेत. या दोन्ही उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. तत्पूर्वी खासदार शिंदे यांनी गेल्या दशकात काय विकास कामे केली. कोणते प्रकल्प मंजूर केले. याचा लेखा जाेखा मांडणारा खासदार शिंदे यांचा कार्यअहवाल विकास दशक या नावाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या सावित्रीबाई पुल नाट्यगृहात प्रकाशित केला जाणार आहे. या विकास दशकाच्या बॅनरवर महायुतीतील सर्वांचे फोटो आहेत. हा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महायुतीला नरेंद्र मोदीकरीता पाठिंबा देणारे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचाही फाेटो आहे.
मात्र कल्याण लोकसभेतील कल्याण ग्रामीण विधानसभेचे मनसेचे आमदार राजू पाटील यांचा फोटो नाही. वास्तविक पाहता महायुतीला पाठिंबा दिल्यावर कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याणची जबाबदारी मनसेच्या वतीने आमदार राजू पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मनसेची साथ महायुतीला मिळणार आहे. मात्र महायुतीकडून मनसे आमदारांचाच फोटो बॅनरवर नसल्याने पुन्हा तर्क वितर्क व्यक्त केले जात आहेत. आमदार पाटील यांचा फोटो बॅनरवर नसल्याने राजकीय वर्तूळात आता याची चर्चा सुरु झाली आहे.