पिंपरी : गाड्यांची तोडफोड करुन नागरिकाला लुटणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हि कारवाई रविवारी रोजी करण्यात आली. याप्रकरणी बळीराम सुभाष बिराजदार (वय 34 रा. भोसरी) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. यावरून पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांचे इतर 4 ते 5 साथीदार मात्र फरार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बिराजदार हे शनिवारी (दि.16) चिंचवड येथील रामनगर येथील रोडवर त्यांची पिकअप घेऊन थांबले होते. यावेळी संबंधित अल्पवयीन मुले व त्यांचे साथीदार तेथे आले व त्यांनी फिर्यादीकडून जबरदस्ती 15 हजार रुपये व 5 हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून घेतले. तसेच परिसरात उभ्या असलेल्या सात ते आठ गाड्यांची तोडफोड करत परिसरात दहशत पसरवली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.