Tourist Bus Accident Near Wathar 10 Students Injured
Satara News : वाठारजवळ सहलीच्या बसला अपघात; दहा विद्यार्थी गंभीर जखमी
नाशिक येथील विद्यार्थ्यांची बस कोकणातून परतीच्या प्रवासात होती. वाठार हद्दीत रस्त्याचे काम सुरू असल्याचा चालकाला अंदाज न आल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि बस साईडला खोदकाम केलेल्या जागेत घसरून खाली कोसळली.
कराड : वाठार (ता. कराड) परिसरात मंगळवारी पहाटे नाशिकहून सहलीवरून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झाला. या दुर्घटनेत नऊ ते दहा विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील विद्यार्थ्यांची बस कोकणातून परतीच्या प्रवासात होती. वाठार हद्दीत रस्त्याचे काम सुरू असल्याचा चालकाला अंदाज न आल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि बस साईडला खोदकाम केलेल्या जागेत घसरून खाली कोसळली. सुदैवाने बस रस्त्याच्या कामाच्या बाहेर खोल दरीकडे न गेल्याने मोठी जीवितहानी टळली; मात्र अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेंद्र जगताप व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्य राबवत विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
दोन सरकारी बसेसची समोरासमोर भीषण टक्कर
तामिळनाडूतील कराईकुडीजवळ दोन सरकारी बसेसची समोरासमोर भीषण टक्कर झाली. या दुर्घटनेत अकरा जणांचा जागीच मृत्यू झाला असून, २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात कराईकुडीपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर झाला. मृतांमध्ये आठ महिला, दोन पुरुष आणि एका मुलाचा समावेश आहे.
तामिळनाडूमध्ये एका आठवड्यातील दुसरी घटना
तामिळनाडूमध्ये एका आठवड्यातील ही दुसरी मोठी बस टक्कर आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तेनकासी (Tenkasi) जिल्ह्यात दोन बसची टक्कर झाली होती, ज्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि ५० हून अधिक जखमी झाले होते. दोन्ही बसमध्ये किमान ५५ प्रवासी होते. जखमींपैकी अनेकांना गंभीर दुखापतींसह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, ज्यात त्यांचे हात, पाय आणि डोके फ्रॅक्चर झाले आहेत. तेनकासी येथे हा अपघात तेव्हा घडला, जेव्हा मदुराईहून सेनकोट्टईला जाणारी एक खासगी बस तेनकासीहून कोविलपट्टीला जाणाऱ्या दुसऱ्या बसला धडकली. या टक्करीत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.