इराण इस्रायल युद्धामुळे कर्मिशियल गॅस शॉर्टेज सातारा हॉटेल इंडस्ट्रीवर परिणाम होत आहे (फोटो - AI)
सातारा जिल्हा हा महाबळेश्वर, पाचगणी, कास पठार, सज्जनगड, कोयना धरण आणि वासोटा किल्ला यांसारख्या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळांमुळे वर्षभर पर्यटकांनी गजबजलेला असतो. या पर्यटनावर हजारो कुटुंबांचा हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट आणि खानावळ व्यवसाय अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा खंडित झाल्याने अनेक हॉटेल्समध्ये स्वयंपाकघर चालवणे कठीण झाले आहे.
हे देखील वाचा : UAE मध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी धोक्याची घंटा! दूतावासाकडून कडक नियमावली जाहीर
हॉटेल व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, गॅस एजन्सीकडून पुरेशा प्रमाणात कमर्शियल सिलेंडर मिळत नाहीत. काही ठिकाणी सिलेंडर मिळण्यास विलंब होत आहे, तर अनेक विक्रेते “शासन निर्देश असल्याने कमर्शियल सिलेंडर देऊ शकत नाही” असे सांगत आहेत. परिणामी काही हॉटेल मालकांना बाजारातून जादा दराने सिलेंडर घ्यावे लागत असून व्यवसायाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
पर्यटन हंगामात सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होतात. विशेषतः महाबळेश्वर व पाचगणी परिसरात हॉटेल आणि रेस्टॉरंटची मोठी संख्या आहे. मात्र सिलेंडर टंचाईमुळे अनेक हॉटेल्सना नाश्ता आणि जेवणाच्या सेवा मर्यादित कराव्या लागल्या असून काही ठिकाणी स्वयंपाकघर तात्पुरते बंद करण्याची वेळ आली आहे.
या परिस्थितीमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आणि तेल कंपन्यांनी तातडीने हस्तक्षेप करून कमर्शियल गॅसचा नियमित पुरवठा सुरू करावा, अशी मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे. अन्यथा हजारो कामगारांच्या रोजगारावर गदा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गॅस एजन्सींकडूनही पुरेसा साठा उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे इंधन पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. जर लवकर तोडगा निघाला नाही तर पर्यटनावर आधारित सातारा जिल्ह्याच्या स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पर्यटन हंगामाच्या तोंडावरच निर्माण झालेल्या या संकटामुळे सातारा जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
हे देखील वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट; एक आरोपी येणार जेलबाहेर, कारण काय?
या परिस्थितीवर उंब्रजमधील हॉटेल पंचमीचे पद्माकर शेट्टी म्हणाले की, “कमर्शियल सिलेंडर मिळणे बंद झाले आहे. उंब्रज (ता. कराड) येथे विविध कंपन्यांचे सिलेंडर विक्रेते शासन आदेशानुसार कमर्शियल गॅस विक्रीवर निर्बंध असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय मोठ्या अडचणीत आला आहे. अन्न शिजवायचे कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की कामगारांचा पगार देणेही कठीण झाले असून संपूर्ण व्यवसाय अडचणीत सापडला आहे, अशी व्यथा त्यांनी मांडली.
“शासन निर्देश असल्याने वितरण बंद”
शिरगाव मधील शिरगावकर HP गॅस एजन्सीचे धीरज पाटील म्हणाले की, “कमर्शियल गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून आदेश आल्याने आम्ही कोणत्याही व्यावसायिक कनेक्शनधारकाला कमर्शियल सिलेंडर देऊ शकत नाही. नियम व आदेश डावलून पुरवठा केल्यास आम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे नवीन आदेश येईपर्यंत कमर्शियल सिलेंडर विक्री बंद ठेवण्यात आली आहे.”






