मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यूनंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune Express Way) इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ITMS) प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यासाठी आज द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक (Block) घेतला जात असून किवळे ते सोमटणेदरम्यान हे काम सुरू होत आहे. या दोन तासांसाठी जुन्या पुणे मुंबई-महामार्गाकडे (NH4) वाहतूक वळवली जाणार आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर काही दिवसांपूर्वी विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूनंतर सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर विरोधकांनी यावरुन गदारोळही केला. त्यानंतर सरकारने तात्काळ पावले उचलत इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सुरु करण्याचा निर्णय घेतला. ३४० कोटींचा हा प्रकल्प असेल. यातील ११५ कोटी उभारणीसाठी तर उर्वरित २२५ कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत.
इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम या सिस्टिमद्वारे वाहतुकीचे नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होईल. या प्रणालीमध्ये ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचेल. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील. त्याशिवाय अशा वाहनांना अडवण्याचे निर्देश पोलिसांना मिळतील, ज्यामुळे अशा वाहनांना अडवून संभाव्य अपघात टाळता येतील. ३९ ठिकाणी वाहनांचा वेग मोजणारी यंत्रे असणार आहेत.