नागपूर : कोणत्याही शहराची ओळख तेथील वाहतूक व्यवस्थेवरून होते. शहरात वाहतुकीशी संबंधित समस्या अत्यंत गंभीर आहे. नागपूर स्मार्ट आणि वेगाने विकसित होणारे शहर आहे. त्यामुळे येथील वाहतूक व्यवस्थाही स्मार्ट असली पाहिजे. त्यासाठी पोलिस विभागाने कंबर कसली आहे आणि येणाऱ्या काळात आमूलाग्र बदल दिसून येईल, असा विश्वास पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी दिला.
आयुक्त सिंघल यांनी बुधवारी ‘नवराष्ट्र-नवभारत’ला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी एडिटर इन चीफ विनोद माहेश्वरी, व्यवस्थापकीय संपादक निमिष माहेश्वरी आणि संचालक वैभव माहेश्वरी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
सिंघल म्हणाले की, पोलिस विभाग शहरात विविध ठिकाणच्या वाहतूक समस्येचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांना दिलासा देण्यासाठी केवळ दिखावा केल्याने परिस्थिती सुधारणार नाही. त्यासाठी अभ्यास आवश्यक आहे. वाहतूक व्यवस्था बिघडण्याचे विविध कारणं आहेत. जे पोलिसांना शक्य असेल ते तत्काळ करण्यात येईल. आवश्यकतेनुसार, इतर विभागांशीही समन्वय साधून सुधारणा करावी लागेल.
शहरात वाहनचालक चुकीच्या बाजूने वाहन चालवताना दिसतात. हे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे त्यांनी विभागाला चालान सोबतच आयपीसी अंतर्गत एफआयआर करण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक ठिकाणी दुभाजक कट करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक ठिकाणी पालकांवर मोठी जबाबदारी वाहतुकीच्या नियमांबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
केवळ चालान करून वाहतूक व्यवस्था सुधारता येणार नाही. त्यासाठी बालवयापासूनच मुलांवर वाहतूक नियमांबाबतचे संस्कार होणे आवश्यक आहे. पालकांवर मोठी जबाबदारी आहे. त्यांनी स्वतः ही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. लहान मुले मोठ्यांना पाहूनच शिकत असतात. आपण नियम मोडले तर मोठे होऊन ते सुद्धा नियम मोडतील.