मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर व्हीआयपी दर्शन बंद; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नियम पाळत घेतले केवळ मुखदर्शन
पंढरपूर/ शिवाजी हळणवर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद केली आहे. या निर्णयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोणताही अपवाद न करता व्हीआयपी दर्शनाचा लाभ न घेता केवळ श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले. त्यामुळे ‘नियम सर्वांसाठी समान’असल्याचा ठोस संदेश त्यांनी दिल्याची चर्चा दिवसभर पंढरपुरात रंगली.एकादशीच्या दिवशी मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधींनीही व्हीआयपी दर्शनाचा आग्रह धरू नये, वारकऱ्यांच्या दर्शनाला प्राधान्य द्यावे, असा अप्रत्यक्ष संदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कृतीतून गेल्याचे बोलले जात आहे.
आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात दाखल झालेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंदिर परिसरातील दर्शन व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. दर्शन रांगेत भाविकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, सुलभ व जलद दर्शन व्हावे, यासाठी प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला.यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही मुखदर्शन घेतले.
मंदिर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. मंत्री प्रकाश आबिटकर आणि योगेश कदम यांचाही सत्कार करण्यात आला.यानंतर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या मंदिर जतन व संवर्धनाच्या कामांची माहिती शिंदे यांनी घेतली. प्रस्तावित नवीन दर्शन मंडप, मंदिर परिसरातील विकासकामे आणि भविष्यातील नियोजनाबाबत कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सविस्तर माहिती दिली.
पंढरपूर कॉरिडॉर योजनेबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नागरिकांशी चर्चा केली. कोणतीही कार्यवाही नागरिकांना विश्वासात घेऊनच केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पत्रा शेड येथील रिद्धी-सिद्धी दर्शन मंडपात रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःच्या हस्ते पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. वारकऱ्यांशी संवाद साधत प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यानंतर त्यांनी चंद्रभागा नदीपात्र आणि वाळवंट परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली. आरोग्य विभागाच्या वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन करून होडीतून नदीपात्राची पाहणी करताना सुरक्षाव्यवस्था, लाईफ जॅकेट आणि बचाव उपाययोजनांचा आढावा घेतला. स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून सुरक्षित साधनांचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
भक्तीसागर येथील आपत्कालीन कक्षाची पाहणी करून आयसीयूमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची त्यांनी विचारपूस केली. डॉक्टरांशी चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर भक्तीसागर परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शासन आणि प्रशासन २४ तास सज्ज आहे. आषाढी वारी निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.
यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार समाधान आवताडे, आ.अभिजित पाटील, आ.राजू खरे, आ.तानाजी सावंत, नगराध्यक्षा प्रणिता भालके, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी महेश रोकडे, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.






