धाराशिव : तुळजापूर-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. धाराशिवमधील तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या काळात सोलापूरहून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते. यामुळे तुळजापूर- सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी 27 ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
तुळजापुरातील शारदीय नवरात्र महोत्सव ६ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर रोजी कालावधीत पार पडणार आहे. यात्रा काळात देशभरातून देवीदर्शनासाठी येणार्या लाखो भाविकांची मोठी गर्दी होते. या यात्रेसाठी सोलापूरहून भाविक पायी तुळजाभवानी मातेच्या मंदिराला भेट देतात. या महामार्गावरून पायी जाणाऱ्यांची भाविकांची संख्या प्रचंड असते. या यात्रेसाठी त्यादृष्टीने मागील दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन, मंदिर प्रशासन व तुळजापूर नगरपालिका प्रशासन तयारी करत आहे.
या संदर्भात ही एक आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत विभागनिहाय यंत्रणेकडून झालेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी प्रसारमाध्यमांना महत्वाची माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे म्हणाले की, ‘तुळजापुरातील नवरात्र महोत्सवाची प्रशासनामार्फत संपूर्ण तयारी झाली आहे. या यात्रेच्या काळात सोललेले नारळ, तेल, प्लास्टिक पिशव्या विक्री करण्यावर मनाई करण्यात आली आहे. तसेच तुळजापूर मंदिरात जाण्यासाठी घाटशीळ पार्किंग येथून प्रवेश दिला जाणार आहे. याचबरोबर भाविकांना मातंगी मंदिर, जिजाऊ महाद्वारमधून सोडण्यात येणार आहे. या यात्रेदरम्यान,अतिक्रमणविरोधी पथक तैनात करण्यात आलंय.
‘या यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील २१ ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. या यात्रेमुळे तुळजापूर-सोलापूर मार्गावरील वाहतूक गर्दीमुळे २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान बंद राहणार आहे, अशी माहिती डॉ. ओम्बासे यांनी दिली.