संग्रहित फोटो
पुणे : पुणे रेल्वे स्टेशनच्या फलाटवर प्रवाशांकडील आणि शहरातील विविध भागात नागरिकांचे मोबाईल हिसकावणाऱ्या राज्यस्थानातील दोन चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. राज्यस्थानतून पुण्यात येऊन रस्त्याच्या कडेला झोपडी टाकून त्याठिकाणी वास्तव्य करत रात्री तसेच दिवसा हे आरोपी मोबाईल चोरत असल्याचे समोर आले आहे. पुणे लोहमार्ग पोलिसांनी या दोघांना पकडून तब्बल २० मोबाईल जप्त केले आहेत.
बुद्धराज मोरपाल बागडी (वय ३२) अमरलाल हंसराज बागडी (वय २२, दोघेही, रा. मंगळवार पेठ. मुळ. राज्यस्थान) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. ही कारवाई लोहमार्ग पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी जयराम पायगुडे तसेच पोलिस निरीक्षक प्रमोद खोपीकर व त्यांच्या पथकाने केली आहे.
वडगाव शेरीतील रूतुराज काटकर हे त्यांच्या मित्रांसोबत बाहेर निघाले होते. ते काही दिवसांपुर्वी पुणे रेल्वे स्थानक येथून रेल्वेत बसत असताना गर्दीतून अचानक त्यांचा मोबाईल चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना माहिती मिळाली की, दोन आरोपी मंगळवार पेठ येथे रस्त्याच्या कडेला झोपडी टाकून राहतात. ते नागरिकांचे मोबाईल चोरतात. त्यांच्याकडे मोबाईल आहेत. त्यानूसार पथकाने याठिकाणी छापा कारवाई केली. तेव्हा दोघेही पोलिसांना पाहून पळाले. मात्र, पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले.
त्यांच्या झोपडीची झडती घेतली असता त्याठिकाणी पोलिसांना वेगवेगळे तब्बल २० मोबाईल मिळाले. पोलिसांनी पाहणी केली असता तक्रारदार रुतुराज काटकर यांचा चोरलेला मोबाईल देखील मिळाला. चौकशीत त्यांनी सांगितले की, जुन्या बाजारातून ते खात्री न करता मोबाईल विकत घेतात आणि तेच मोबाईल नागरिकांना विकतात. मात्र, पोलिसांनी दोघांना अटक करून सखोल चौकशी केली असता आरोपी हे वेगवेगळ्या भागातून मोबाईल चोरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
शनिवारवाडा परिसरातून वाहनांची चोरी
कुटुंबियांसोबत देखावे पाहण्यास आल्यानंतर रिक्षा शनिवारवाडा परिसरात पार्क करून गेले असता अज्ञाताने रिक्षाची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चोरट्यांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ३८ वर्षीय रिक्षाचालकाने तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रिक्षाचालक कुटुंबीयासोबत रविवारी (३१ ऑगस्ट) दुपारी देखावे पाहण्यास आला होता. त्याने शनिवारवाडा येथे रिक्षा लावली. त्यावेळी चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करुन रिक्षा चोरून नेली. देखावे पाहून रिक्षाचालक तेथे आला. तेव्हा रिक्षा जागेवर नसल्याचे आढळून आले. नंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. चोरीला गेलेल्या रिक्षाची किंमत ७५ हजार रुपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलीस हवालदार कोकाटे तपास करत आहेत.