सौजन्य - नवराष्ट्र टीम
मंगळवेढा : मंगळवेढा शहरातून ऊस भरुन कारखान्याकडे निघालेला ट्रॅक्टर दामाजी चौकातील इंग्लिश स्कूल गेटच्या समोर पलटी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली असून, पाच दिवसात ट्रॅक्टर पलटी होण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. दरम्यान या दोन्ही घटना सुट्टीच्या दिवशी व पहाटे घडल्यामुळे सुदैवाने यात कोणतीही हाणी होऊ शकली नाही. प्रशासन दोन घटना घडूनही कोणाच्या मृत्यूची वाट पाहते काय? असा संतापजनक सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.
मंगळवेढा शहरातून दिवसरात्र ऊसाने भरलेले ट्रॅक्टर व कर्नाटकामधून येणार्या अवजड वाहनांची ये- जा सुरु असते. जागरुक नागरिकांनी अवजड वाहतूक थांबविण्यासाठी वेळोवेळी आंदोलन केल्यावर पंढरपूर बायपास रोड जवळ कमान नगरपालिकेने बसविली मात्र ही कमान प्रमाणापेक्षा उंच असल्याने याचा परिणाम अवजड वाहनावर न होता अलगदपणे शहरात जोमाने वाहने येत असल्यामुळे दामाजी चौकात शालेय मुले, नागरिक, वृध्द यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरुन ओलांडावा लागतो. नगरपालिकेने केवळ कमान बसवून रडक्याचे डोळे पुसण्याचे काम केल्याच्या तिखट प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.
पोलीसांनी अवजड वाहनावर दंडात्मक कारवाई केल्यास याला निश्चित आळा बसेल मात्र पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासनाकडे बोट दाखवत असल्यामुळे लोकांचे आत्तापर्यंत दहा जणांचे जीव जावूनही तु… तु… मै… मै.. चा प्रकार सुरु असल्याने नागरिकांनी या कामकाजाबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हे सुद्धा वाचा : रस्ता ओलांडताना जोरात बस आली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना
रविवारी भर दुपारी मोकळ्या टॅ्रक्टचे ट्रेलर इंग्लिशस्कूलच्या समोर दामाजी चौकात पलटी झाल्याची घटना घडली होती. यानंतरही नगरपालिका व पोलीस प्रशासन तोंडावर बोट ठेवूनच आहे. शुक्रवारी पहाटे ऊसाने भरलेला ट्रेलरच चक्क पलटी झाला. सुदैवाने येथे नागरिकांची वर्दळ नसल्यामुळे दुर्घटना टळली. सध्या नगरपालिकेचा प्रशासन कारभार प्रांत अधिकारी हे पाहत असून, त्यांचीही भूमिका गांधारीची असल्याने नागरिकांना या अवजड वाहनाबाबत मोठा गंभीर प्रश्न पडल्याच्या प्रतिक्रीया सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. यापुर्वीही त्यांच्याकडे मनसे तसेच वारी परिवार यांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र या तक्रारीचा शंभर टक्के निपटारा न झाल्याने अद्यापही अवजड वाहतूक शहरामधून सुरु असल्याचे चित्र असून अजून कुणाच्या मरणाची वाट हे पाहतात काय? असा सवालही जेष्ठ नागरिक करीत आहेत.
पादचारी महिलेचा मृत्यू
सातारा रस्त्यावर भरधाव पीएमपीने दिलेल्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नातूबाग परिसरात हा अपघात घडला असून, महिला विवाह सोहळ्यावरून घरी निघाली होती. अपघातात महिलेबरोबर असलेली नात गंभीर जखमी झाली आहे. आशाबाई दत्तात्रय साळुंके (वय ५७, रा. हिराबाग, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता) असे मृत्यू झालेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. अपघातात साळुंके यांची नात प्रचिती जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.