मराठी माणसाच्या एकतेसमोर सरकारची सक्ती हरली; हिंदी भाषेचा 'जीआर' रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
राज्य सरकारने शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीच्या त्रिभाषा सूत्राचा निर्णय अखेर मागे घेतला आहे. १६ एप्रिल आणि १७ जून रोजी घेतलेले निर्णय रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून, “मराठी माणसाच्या एकतेसमोर सरकारची सक्ती हरली” असं त्यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीप्रमाणेच हीदेखील एक चळवळ होती. मराठी माणूस एकवटल्यावर कुठलीही सक्ती टिकत नाही हे पुन्हा सिद्ध झाले. सरकारचा हेतू मराठी-अमराठी वाद उभा करून मराठी माणसांची एकजूट मोडण्याचा होता, मात्र मराठी जनतेने परिपक्वतेने आणि समंजसपणे याला विरोध करत भाषेच्या नव्हे, तर सक्तीच्या विरोधात आपला निषेध नोंदवला. त्यामुळे समाजात फूट न पडता एकजूट अधिकच बळकट झाली.”
भाजपावर तीव्र निशाणा साधताना ठाकरे म्हणाले, “काही वर्षांपूर्वी ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ नावाचा चित्रपट आला होता, आता भाजपा म्हणजे अफवांची फॅक्टरी झाली आहे. अफवा पसरवून, विरोधकांची बदनामी करून आणि जनतेला गोंधळात टाकून सत्तेचा मार्ग स्वच्छ करण्याचा उद्योग त्यांचा आहे. मात्र, मराठी जनतेने त्यांच्या या कारस्थानाला चोख उत्तर दिलं आहे.”
येत्या ५ जुलै रोजी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन सक्तीविरोधात मोर्चा काढणार होते. पण सरकारने निर्णय मागे घेतल्यामुळे, हा मोर्चा आता ‘विजयी सभा’ असू शकतो, असेही उद्धव ठाकरे यांनी सूचित केले. “हा निर्णय मागे घेतला असला तरी मराठी एकतेच्या या क्षणाचा उत्सव साजरा व्हावा आणि पुढेही असा निर्धार राहावा यासाठी ५ जुलैला आम्ही एकत्र येऊ. पुढील दिशा ठरवण्यासाठी त्या दिवशी सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल,” असे ठाकरे म्हणाले.
ठाकरेंनी असेही सांगितले की, “राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही माशेलकरांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्यावर अभ्यासगटाची निर्मिती झाली, पण एकही बैठक झाली नाही. मात्र, सरकार पडल्यावर भाजपाने खोटं पसरवायला सुरुवात केली आहे. जनतेची दिशाभूल करून खोट्या गोष्टींचा प्रचार करण्याचं काम भाजपाकडून सुरू आहे.”
उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत मराठी जनतेची एकजूट हीच मोठी शक्ती असल्याचे अधोरेखित केले. भाजपावर अफवा पसरवण्याचा गंभीर आरोप करत त्यांनी ५ जुलै रोजीच्या कार्यक्रमाची रूपरेषा देखील बदलली जाऊ शकते असे संकेत दिले आहेत.