नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 16 आमदारांच्या (MLA) अपात्रतेवर आज निकाल (Result) दिला आहे. आता निर्णयाचा चेंडू कोर्टानं विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टोलावला आहे. याचा निकाल विधानसभा अध्यक्ष देतील, असं कोर्टानं म्हटलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे. त्यामुळं थोडक्यात शिंदे सरकार बचावलं आहे. कारण आता हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षात शिंदे गटाला काही धक्के दिले असले तरी शिंदे सरकार बचावलं आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याऐवजी बहुमत चाचणीला सामोरे गेले असते. तर परिस्थिती वेगळी असती.
…अन् शिंदे सरकार वाचलं
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा तातडीने राजीनामा दिला. पण त्यांचा हाच राजीनामा देणे महागात पडल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शिंदे सरकार आज वाचलं. राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यास सांगणे चुकीचे होते. मात्र, नंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने तेव्हाची स्थिती आता निर्माण केली जाऊ शकत नाही. त्यामुळे नंतर राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पाचारण करणे योग्य व न्याय्य होते, असेही न्यायालयाने म्हटलं आहे.