इस्लामाबादमध्ये वनश्री दूध उत्पादक शेतकरी मेळाव्यामध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण सहभागी झाले (फोटो - टीम नवराष्ट्र)
इस्लामपूर : नवनवे तंत्रज्ञान वापरून दूध उत्पादन कसे वाढेल यासाठी प्रयोग करायला हवेत. जगभरात अनेक देशांनी दुग्ध व्यवसायात क्रांती केली आहे. वनश्री दूध संस्थेच्या माध्यमातून महाडिक बंधूनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक हातभार लावण्यासाठी योगदान दिले आहे. राज्य आणि केंद्र सरकार मदतीसाठी नेहमीच पुढे असेल असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले.
वनश्री दुध संघ यांच्या नुतन संचालकांची निवड व दुध उत्पादक शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र चव्हाण यांचा भव्य सत्कार झाला. विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रविण दरेकर,पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले,” तीन तालुक्यातील १३० हून अधिक दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून दूध संकलित केले जात आहे. वडिलांच्या स्मृती जपताना वनश्री या नावाने उभारलेल्या दूध संघाच्या माध्यमातून दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी महाडिक बंधू यशस्वी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी आदर्शवत काम करत आहेत.” अशा भावना रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले,” दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भावना घेऊन कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो आहे. सरकारच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. वनश्री दूध उत्पादक संस्थेचा विस्तार करण्यासाठी गरज लागल्यास मुंबई जिल्हा बँक अर्थ पुरवठा करण्यासाठी तयार आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विकास सहकार क्षेत्रामुळे झाला आहे. मात्र आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. सहकारातील कारखानदारीचे खाजगीकरण झाले आहे. ग्रामीण भागाचा अर्थव्यवस्थेचा कणा असणारा सहकार आता मोडकळीस आलाय की काय ? अशी परिस्थिती तयार झाली आहे. राज्यातील विविध भागांमध्ये सहकाराची नेमकी काय अवस्था आहे ही जाणून घेण्याची आवश्यकता आता वाटू लागली आहे.” असे मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी सम्राट महाडिक म्हणाले” काही मूठभर व्यापाऱ्यांच्या ताब्यात दूध धंदा गेला आहे. त्यांची मनमानी या व्यवसायात सुरू असल्याने दुग्ध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. सरकारची पकड कमी झाली आहे. भेसळयुक्त दूध व इतर उपपदार्थ खुलेआम सरकारच्या परवानगीने बाजारपेठेत आहेत. सरकारने लक्ष देऊन दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा. वनश्री दूध डेरीच्या माध्यमातून प्रतिदिनी ४० हजार लिटर दूध दूध संकलन केले जात आहे. विविध दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करून पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई परिसरात विक्री केली जात आहे. आमची उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.”
आमदारकीचे स्वप्न आणि इच्छा !
विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला आहे. कमी वयामध्ये मला सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून नेतृत्वाची संधी दिली. आतां जिल्हाध्यक्ष म्हणून माझी काही मागणी नाही मात्र माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांची इच्छा पूर्ण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी एका कार्यक्रमाचा दाखला देतांना अण्णा डांगे यांनी भावी आमदार सम्राट महाडिक असा उल्लेख केल्याची आठवण करून दिली.
यावर आमदार प्रवीण दरेकर म्हणाले,” सम्राट बाबांचे आमदारकीचे स्वप्न मनातून जायला तयार नाही. आक्रमक नेते आहात.तुमचा आक्रमकपणा विधानसभेच्या निवडणुकीत जवळून पाहिला आहे. एक आमदार होण्यापेक्षा आपण जिल्ह्यातील अनेक आमदारांसाठी मार्गदर्शक आहात. मात्र कार्यक्रमात बोलताना महाडिक यांनी आमदारकी इच्छा असल्याचे बोलून दाखवताना अण्णासाहेब डांगे आप्पांनी इच्छा बदलू नये असे सूतोवाच केले.