पुरंदर विमानतळाला ग्रामस्थांचा विरोध (फोटो- istockphoto)
सासवड; महाराष्ट्र शासनाने पुरंदर तालुक्यातील आपल्या गावांची विमानतळ प्रकल्पासाठी निवड केली असून प्रकल्प करण्यासाठी शासनाने पूर्ण तयारी केली आहे. आपल्याला पुढील काळात अनेक आव्हाने पार पाडावी लागणार आहेत. प्रकल्पाच्या नावाखाली बाहेरचे लोक येवून मालक होतील. आपले पिढ्यानपिढ्याचे गाव सोडून कायमचे विस्थापित व्हावे लागेल. आपल्या मदतीला कोणी येणार नाही. गुंडगिरी वाढेल आपण इथले मालक असताना बेरोजगार होईल. यासाठी शासनाला विरोध करताना पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाऊ पण प्रकल्पाला आपला विरोध कायम ठेवू. असा निर्धार वनपुरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, कुंभारवळण, एखतपूर, खानवडी, मुंजवडी या सात गावांमध्ये विमानतळ प्रकल्प जाहीर केला असून प्रकल्पाच्या बाबतीत दररोज वेगवेगळे आदेश शासनाच्या वतीने पारित केले जात आहेत. यामुळे स्थानिक ग्रामस्थ अधिक चिंताग्रस्त झाले असून सर्व गावांतील ग्रामस्थांकडून प्रकल्पाला जोरदार विरोध केला जात आहे. यासाठी दररोज गावोगावी वाड्या वस्त्यांवर बैठका घेण्यात येत असून या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या वनपुरी येथे पाडव्याच्या निमित्त आयोजित बैठकीत शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी लोकशासक आंदोलनाचे राज्य संघटक राजेंद्र गायकवाड, पीएस मेमाणे, माजी सरपंच रामदास कुंभारकर, नामदेव कुंभारकर, संजय कुंभारकर, पारगाव उपसरपंच चेतन मेमाणे, मच्छिंद्र कुंभारकर, संतोष हगवणे, संतोष कुंभारकर, शिवाजी कुंभारकर, राजेंद्र कुंभारकर तात्यासाहेब मगर, बाळासाहेब कुंभारकर, माउली कुंभारकर, हनुमंत कुंभारकर, सयाजी कुंभारकर तुकाराम महामुनी, लंकेश महामुनी, सतीश कुंभारकर, सोमनाथ कुंभारकर, महादेव कुंभारकर, तान्हुबाई कुंभारकर, वैशाली कुंभारकर, वर्षा कुंभारकर, रेश्मा खेडेकर यांच्यासह महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Purandar Airport: पुरंदर विमानतळाबाबत समोर आली मोठी बातमी: MIDC ने जाहीर केला ‘हा’ निर्णय
पारगाव येथील पीएस मेमाणे यांनी वेळप्रसंगी सर्वांनी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी असे आवाहन केले.जीवनाची आरपारची लढाई आहे. यापूर्वी आपल्याल राजकीय पाठबळ मिळाल्याने विरोध करणे शक्य झाले मात्र आता कोणताही राजकीय पाठिंबा मिळणार नाही. आपल्यालाच आपली ताकद पूर्ण क्षमतेने तयार करावी लागणार आहे. वेगवेगळ्या मार्गाने दबावतंत्राचा वापर होईल, माणसे फोडली जातील मात्र आपण शेवटपर्यंत एकनिष्ठ राहून जमीन वाचविण्यासाठी न्यायालयात जाऊन आपला लढा जिंकू असा विश्वास व्यक्त केला.
उपस्थित महिलांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या. तुम्ही आम्हाला आवाज द्या, आम्ही घरेदारे बंद करून शासनाच्या विरोधातील लढाईत सहभागी होवू पण विमानतळ प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होवून देणार नाही. आम्हाला लाठ्याकाठ्यांची भीती नाही. आम्ही खरे मालक असून छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत हे शासनाने ध्यानात घ्यावे असा थेट इशारा महिलांच्या वतीने तान्हुबाई कुंभारकर, रेश्मा खेडेकर आणि इतर महिलांनी दिला.