रविंद्र माने – वसई : पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या नालासोपारातील नैसर्गिक नाल्यावरील अनधिकृत बांधकाम तोडल्याची खोटी माहिती पालिकेच्या इ-प्रभागाने दिल्यामुळे या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाने दिला आहे. विरार आणि नालासोपारातील पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या समेळपाडा येथील नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. या नाल्यावर भराव टाकून इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे थोड्याशा पावसात साईनगर, शुर्पारक मैदानाचा परिसर आणि समेळगावात पुर परिस्थिती निर्माण होत असते.
त्यामुळे ही बांधकामे दुर करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ, शिवसेना, काँग्रेस, उध्दव ठाकरे गट, भाजप आणि राष्ट्रीय समाज पक्षाने केली होती. मात्र, त्याकडे पालिकने विशेषतः इ-प्रभागाने दुर्लक्ष केल्यामुळे परिसर यंदाच्या पावसात तिनदा पाण्याखाली गेला होता. पालिकेचा आशिर्वाद मिळाल्यामुळे या नाल्याच्या कडेला पुन्हा भराव करुन आणखीन काही अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. या बांधकामांची रासपचे पालघऱ जिल्हाध्यक्ष नितीन पेंढारी यांनी केलेल्या नवीन बांधकामांना जुने ठरवून सहाय्यक आयुक्ता निता कोरे यांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली.
त्यामुळे पेंढारी यांनी उपायुक्त किशोर गवस यांच्याकडे तक्रार केली असता, सदर बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश गवस यांनी ई प्रभागाला दिले होते. या आदेशाचा पाठपुरावा केला असता, अनधिकृत बांधकामे तोडण्यात आल्याची खोटी माहिती निता कोरे आणि त्यांचे ठेका अभियंता कृतार्थ ठाणगे यांनी गवस यांना दिल्याचे उघड झाले. त्यावरून इ प्रभागाचे अधिकारी समेळपाडा नाल्यावरील अनधिकृत बांधकामांना सुरक्षा देत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात सदर बांधकामांवर कारवाई न केल्यास ई प्रभागाला वसुली कार्यालय ठरवून टाळे ठोकण्यात येईल असा इशारा पेंढारी आणि त्यांचे सहकारी रमेश कारांडे, सुरेंद्र तिवारी, अनिता पोतदार, सुखदेव मासाळ आणि राणी क्षिरसागर यांनी पालिका उपायुक्तांना दिलेला निवेदनात दिला आहे.