फोटो सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुण्यातील नेते वसंत मोरे यांच्या राजकारणामुळे चर्चा रंगल्या आहेत. वसंत मोरे यांनी वंचित बहुजन पक्षाला रामराम ठोकत शिवसेना ठाकरे गटाची साथ धरली आहे. वसंत मोरे व ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट झाली. यानंतर ते लवकरच ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. येत्या मंगळवारी वसंत मोरे यांचा शिवसेना ठाकरे गटामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. त्यामुळे पूर्वी वंचित पक्षामध्ये असणाऱ्या वसंत मोरेंवर प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला. वसंत मोरे म्हणाले होते की, वंचित आघाडीच्या लोकांनी मला स्वीकारले नाही. अनेक लोकांनी निवडणुकीत माझे काम देखील केले नाही. लोकसभा निवडणुकीत सर्वांनी काम केले असते तर लोकसभेच्या निवडणुकीचे चित्र वेगळे असते. प्रकाश आंबेडकर यांना अपेक्षित असा पक्ष ते उभा करू शकले नाहीत, असा आरोप वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीवर केला होता. यावर प्रत्युत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, वसंत मोरे यांचे राजकारण आयाराम गयाराम असे आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
वसंत मोरे यांचे राजकारण
लोकसभा निवडणूकीपूर्वी वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर महाविकास आघाडीसोबत त्यावेळी बोलणी केली होती. मात्र ती बोलणी फिस्कटली. यानंतर लोकसभा निवडणुकीला वसंत मोरे अपक्ष म्हणून उभे राहिले होते. वंचितने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी वंचितचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. लोकसभेमध्ये मात्र वसंत मोरे यांचा दारुण पराभव झाला आणि डिपॉझिट देखील जप्त झाले. यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वसंत मोरे यांनी वंचितची साथ सोडत शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे पुण्यातील वंचित कार्यकर्ते आक्रमक देखील झाले आहेत.