लोकसभेतील कामगिरीने होणार आता निर्णय? चारही मतदार संघात इच्छुकांची 'तौबा'गर्दी (फोटो सौजन्य- अमझद खान)
विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवलीतील चारही जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेक इच्छूक असल्याने या चारही विधानसभेत नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. एक एक विधानसभा मतदार संघाकरीता चार ते पाच जण इच्छूक असल्याने कल्याण पश्चिममध्ये शिवसेना गटात अनेक जण इच्छूक आहे. तर कल्याण पूर्वेतही शिंदे गटाकडून अनेक नावे चर्चेत आहे. डोंबिवलीत मंत्री रवींद्र चव्हाण यांना ठाकरे गटाकडून आव्हान आहे. तर कल्याण ग्रामीण मध्ये मनसे आमदार राजू पाटील यांच्याबाबत शिंदे गट काय भूमिका घेणार आहे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
२०१९ सालच्या विधानसभा निवडणूकीत कल्याण पश्चिमेतून शिवसेनेचे विश्वनाथ भोईर निवडून आले. महायुती असताना भाजपचे नरेंद्र पवार यांनी बंडखोरी करुन विश्वनाथ भोईर यांना आव्हान दिले होते. ही जागा भाजपकडे होती. मात्र ऐनवेळी ही जागा शिवसेनेला देण्यात आली. शिवसेनेच्या फूटीनंतर राजकीय परिस्थिती बदलली आहे. कल्याण पश्चिमेत भोईर हे आमदार असले तरी या विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाकडून कल्याण शहर प्रमुख रवी पाटील हे इच्छुक आहेत. या निवडणूकीत महायुतीचे उमेदवार होणार पक्ष त्यांनाच उमेदवारी देणार असा विश्वास त्यांना आहे. या विधानसभा मतदार संघातून माजी नगरसेवक श्रेयस समेळ आणि मयुर पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. या विधाानसभेत भोईर यांना पक्षामधूनच मोठे आव्हान आहे. भाजपकडून वरुण पाटील, प्रेमनाथ म्हात्रे आणि माजी आमदार नरेंद्र पवार हे इच्छूक आहेत. त्यामुळे महायुतीत ही जागा कोणाला जाणार हे अद्याप स्पष्ट नाही. तरीही विद्यमान आमदारांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून सचिन बासरे यांच्या नावाची चर्चा आहे.
तर कल्याण पूर्व विधानसभेत भाजप आमदार गणपत गायकवाड हे २००९ पासून आमदार आहे. तीन वेळा निवडून आले आहेत.. या जागेकरीता शिवसेना शिंदे गटाने कंबर कसली आहे. कल्याण पूर्वेत भाजपकडून गणपत गायकवाड व्यतिरिक्त अन्य कोणी दावा केला नाही. शिंदे गटाकडून निलेश शिंदे, महेश गायकवाड, विशाल पावशे यांची नावे चर्चेत आहेत. निलेश शिंदे यांनी तयारी सुरु केली आहे. पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्याबाबतचे संकेत दिले गेले आहेत. मात्र त्यावर शिक्कामोर्तब केलेले नाही. कल्याण पूर्व देखील महायुतीसाठी डोकेदुखी आहे. महाविकास आघाडीकडून सचिन पोटे आणि नवीन सिंग या दोघांनी इच्छूक आहेत. शिवसेना ठाकरे कडा करून धनंजय बोराडे यांच्या नावाची चर्चा आहे.
डोंबिवलीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री हे रविंद्र चव्हाण हे ते तीन वेळा भाजपकडून निवडून आले आहे. या मतदार संघात चव्हाण यांच्यापुढे ठाकरे गटाकडून आव्हान मिळू शकते. डोंबिवलीत शिंदे गटाकडून तीन नावे चर्चेत आहेत. मात्र रविंद्र चव्हाण यांच्यासमोर एकही असा चेहरा नाही. ज्यासाठी महायुतीत पेच निर्माण होईल असे दिसून येत नाही. ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर अन्य इतरांची नावे चर्चेत आहेत.
कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे आमदार राजू पाटील आहे. लोकसभा निवडणूकीत आमदार पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्याकरीता काम केले. या विधानसभेत पाटील यांच्या समोर शिंदे गटाकडून राजेस मोरे आणि उद्धव ठाकरे गटाकडून सुभाष भोईर काँग्रेसकडून संतोष केणे यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेसचे संतोष केणे हे या वेळी कल्याण ग्रामीणमधून इच्छूक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लोकसभा निवडणुकी खासदार श्रीकांत शिंदे यांना मदत करणारे कल्याण ग्रामीण मनसे आमदार राजू पाटील यांचे बाबत शिंदे गटाकडून काय विचार केला जातो, हे पहाणे महत्त्वाच्या ठरणार आहे. लोकसभेत इच्छूक उमेदवारांनी काय कामागिरी केली या त्यांच्या रिपोर्ट कार्डनुसार महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विचारात घेतले जाणार का.? कारण लोक सभा निवडणुकीत अनेकांची कामगिरी सुमार होती तर काहींनी चांगले काम केले आहे.