पाणी टंचाई असून देखील एकनाथ शिंदेंच्या सभेच्या मैदानावर तीन टॅंकर पाणी वाया घालवले (फोटो - टीम नवराष्ट्र)
Satara Water Crisis : सातारा : साताऱ्यांमध्ये उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई (Water Shortage) जाणवू लागली आहे. मात्र याचा फटका फक्त सामान्य लोकांना बसत असल्याचे समोर आले आहे. एकीकडे उन्हाळ्याच्या तडाख्यात होरपळणाऱ्या सातारकरांवर पाणी कपातीची सक्ती लादणारी सातारा नगरपालिका, (Satara News) तर दुसरीकडे मंत्र्यांच्या स्वागतासाठी लाखो लिटर पाणी अक्षरशः रस्त्यावर ओतताना दिसत आहे. या दुटप्पी धोरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
नगरपालिकेने पाणी बचतीच्या नावाखाली शहरातील २५ प्रभागांमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे आठवड्याला सुमारे ३६ एमएलडी पाणी बचत करण्याचा दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. कपातीच्या दुसऱ्याच दिवशी अनेक भागांत कमी दाबाने किंवा अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने सातारकर त्रस्त झाले आहेत.
अशा परिस्थितीत नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गांधी मैदानावरील स्वागत सभेसाठी मात्र पाण्याची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप होत आहे. धूळ उडू नये म्हणून मैदानावर सुमारे तीन टँकर पाणी मारण्यात आले. म्हणजेच नागरिकांना पाणी वाचवण्याचे आवाहन करणारीच यंत्रणा स्वतःच पाण्याचा अपव्यय करताना दिसत आहे.
हे देखील वाचा : तळेगावात गुन्हेगारीचा सुळसुळाट; कोयत्याच्या धाकाने लूट, तरुणाचे अपहरण
“सातारकरांसाठी पाणी कपात आणि मंत्र्यांसाठी मोकळा नळ हा कुठला न्याय?” असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शासकीय दौऱ्यांसाठी प्रोटोकॉल असतो, सुविधा दिल्या जातात, हे मान्य असले तरी सामान्य जनतेला त्रास देऊनच या सुविधा पुरवायच्या का, असा रोष व्यक्त होत आहे.
याच मुद्द्यावर सामाजिक संस्थांनीही आवाज उठवला आहे. “पाणी कपातीचे नियम फक्त नागरिकांसाठीच आहेत का? ते मंत्र्यांना लागू होत नाहीत का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते हरी शिवशरण यांनी तर “नगरपालिकेचे नियम व्यक्तीगणिक बदलतात का?” असा थेट आरोप केला आहे.
सातारा नगरपालिका ही शहराची ‘मातृसंस्था’ मानली जाते. मात्र त्या संस्थेनेच आपल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकायला लावायचे आणि दुसरीकडे राजकीय कार्यक्रमांसाठी पाणी उधळायचे, ही बाब संतापजनक असल्याची भावना नागरिकांत आहे.
हे देखील वाचा : अमित कदमांचा कोणता झेंडा घेऊ हाती? भाजप नेत्यांशी वाढली सलगी; ठाकरे गटाच्या जीवाला घोर
पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या सातारकरांना दिलासा देण्याऐवजी अशा प्रकारे दुहेरी निकष लावले जात असतील, तर प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आता तरी नगरपालिका या धोरणावर पुनर्विचार करणार का, की “सामान्यांसाठी नियम आणि सत्ताधाऱ्यांसाठी सूट” हीच भूमिका कायम ठेवणार, याकडे संपूर्ण साताऱ्याचे लक्ष लागले आहे.






