आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाविकास आघाडीतील जागा वाटप करण्यात आले.निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडीतील जागा वाटप करण्यात आले नव्हते. या जागावाटपावरून अनेक मतभेद मागील काही दिवसांपासून सुरु होते. पण अखेर आज महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. सकाळी ११ वाजता मुंबईमध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन जागा वाटपाची यादी जाहीर केली. यावेळी महाविकास आघाडीतील बडे नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, शरद पवार , नाना पटोले यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नाना पटोले म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीतील तिढा अखेर संपुष्टात आला आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठं मन केलं आहे. भाजपचे पाणीपत करण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. आमचे सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीतील नेत्यांना निवडूण आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. महाविकास आघाडीतील सर्व उमेदवार विजयी होतील,असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. स्वातंत्र्यलढ्यामध्ये काँग्रेसचे मोठे योगदान आहे. सोनिया गांधींची तब्येत चांगली नसताना त्यांना ईडी कार्यलयात बसवून ठेवण्यात आले, असे नाना पटोले म्हणाले. महाविकास आघाडीतील पत्रकार परिषद ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात पार पडली. या परिषदेला महाविकास आघाडीतील अनेक नेते उपस्थित होते. शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण हे नेते पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले होते.
महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आज महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमधील जागावाटपाचा तिढा सुटला. सांगलीची जागा ठाकरे गटाला मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये फॉर्म्युला देखील जाहीर करण्यात आला.त्यानुसार शिवसेना ठाकरे गटाला २१ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला १० आणि काँग्रेस पक्षाला १७ जागा देण्यात आल्या आहेत.