मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) वर्धापनदिन (MNS Foundation Day) आज साजरा झाला. मनसेचा हा वर्धापनदिन पहिल्यांदाच ठाण्यात (Thane Rally) झाला. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांची जाहीरसभा झाली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. त्यांनी ‘बरेच विषय आहेत सगळ्या तारखा एकदम आल्या. 22 तारखेला आपली गुढीपाडव्याची सभा आहे. त्यासाठी शिवतीर्थावर यावं. मला जे काही बोलायचंय, जे काही वाभाडे काढायचेत, जे कोणाला फाडायचे ते 22 तारखेला पूर्ण बुफे मिळेल’, असे सूचक विधान केले.
ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये मनसेचा मेळावा साजरा झाला. यावेळी राज ठाकरे म्हणाले, महापालिका निवडणुका अजून जाहीर होत नाहीत. दोन वर्षे तेच सुरु आहे. दहावीला नापास झाल्यासारखं वाटतंय. सारखं मार्च-ऑक्टोबर-मार्च हेच सुरु आहे. निवडणुका होऊ देच. तमाम जनता यांना विटलेली आहे. आता त्यांच्यापर्यंत जाण्याची गरज आहे. मी भाषण देईन पण घराघरांपर्यंत तुम्हाला जायचंय, असे त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना उद्देशून भाष्य केले. तसेच निवडणुका कधीही होऊ दे, आपण महानगरपालिकेत सत्तेत असणार म्हणजे असणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
…ते सर्व महाराष्ट्राला खड्ड्यात नेणारं
सध्या महाराष्ट्रात जे काही सुरु आहे ते खड्ड्यात नेणारे आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात पाहिलं नाही ते आज होतंय. गलिच्छ राजकारण केले जात आहे. टीव्हीवर पाहवत नाहीत. आपली लोकं किती खालच्या थराला गेली आहे. किती बोलायचं हे ऐकूही वाटत नाही, असे त्यांनी म्हटले.
राजकारणाचा चिखल झालाय
राजकारणाचा चिखल झाला आहे, त्यावर मी गुढीपाडवा मेळाव्यात बोलणार असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. त्यावेळी ट्रेलर, टीझर नाही तर पूर्ण सिनेमाच दाखवणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले.