vasant more
पुणे : पक्षातील अंतर्गत मतभेदांनंतर मनसेला जय महाराष्ट्र करुन वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकही लढवली. पण निकालानंतर अवघ्या तीन महिन्यातच त्यांनी वंचितला रामराम केला आहे. येत्या 9 जुलैला वसंत मोरे अधिकृतरित्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
तत्पुर्वी त्यांनी वंचितची साथ का सोडली, यावरही भाष्य केले आहे. वंचित मतदारांनी आपल्याला स्वीकारले नाही. पुण्यातील मतदानाचा जो टक्का आपण पाहिला, त्यातून हेच दिसून येते. त्यामुळे मी आता स्वगृही परत जात आहे. असे वसंत मोरेंनी म्हटले आहे.
तसेच, वंचित बहुजन आघाडी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकरांना मेसेज केला. ‘साहेब मला माफ करा. मला माझ्या पाठिशी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करूनच मी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी गुरुवारीच उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आता मी पूर्वीच्या पक्षात जात आहे. त्यानंतर मला प्रकाश आंबेडकरांचा फोनही आला होता. पण आता खूप उशीर झाला असल्याचे मी त्यांना सांगितले.
वसंत मोरे म्हणाले की, मी पूर्वाश्रमीचा शिवसैनिक आहे. वयाच्या १८-१९ व्या वर्षीच मी पुण्यात शिवसेनेची शाखा सुरु केली होती. वयाच्या ३१ वर्षांपर्यंत मी शिवसेनेत होतो. गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरेंचा संघर्ष पाहत आहे. मी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. येत्या 9 जुलैला मी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, एकेकाळी राज ठाकरेंचा शिलेदार म्हणून वसंत मोरे यांची ओळख होती. अनेकदा त्यांच्या इतर पक्षातील प्रवेशाच्या बातम्याही समोर आल्या, पण त्यांनी प्रत्येकवेळी त्या खोट्या ठरवल्या. पण अलीकडच्या काळात पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे अखेर त्यांनी मनसेला सोडण्याचा निर्णय़ घेतला आणि ते लोकसभा निवडणुकीआधी वंचित बहुजन आघाडीत गेले, पण लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.