Why Is Yogi Adityanath Not Speaking On Brijbhushan Singh Question By Nana Patole Nrdm
योगी आदित्यनाथ ब्रिजभूषण सिंगवर का बोलत नाहीत?; नाना पटोलेंचा सवाल
ब्रिजभूषण सिंह याने महिला पैलवानांचे लैंगिक शोषण केले त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला त्यावर योगी गप्प का आहेत? चीनने केलेल्या घुसखोरीवर ते का बोलत नाहीत? असा सवाल पटोले यांनी केला.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात सभा आणि रोड शो केले. प्रक्षोभक वक्तव्ये करून धार्मिक ध्रुविकरण करण्याचा प्रयत्न केला. दहा वर्ष सत्तेत राहूनही त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही. त्यांना प्रचारात कुठेही प्रभाव पाडता आला नाही म्हणून ते खोटे बोलून दुष्प्रचार करत आहेत पण जनता त्यांच्या या भूलथापांना बळी पडणार नाही. देशात आणि राज्यात परिवर्तन निश्चित आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
पटोले म्हणाले की, भाजपने देशभरातील अनेक नेते महाराष्ट्रात प्रचारात उतरवले पण त्यांच्या या स्टार प्रचारकांचा कुठेही प्रभाव दिसून आला नाही. रोड शोच्या नावाने नरेंद्र मोदी यांनी मुंबईला वेठीस धरण्याचा काम केलं. गुजरातवरून आणि बाहेरून लोक आणावे लागले. राज्यातील जनतेने भाजपच्या प्रचाराला प्रतिसाद तर दिलाच नाही उलट अनेक ठिकाणी भाजपच्या नेत्यांना आणि उमेदवारांना लोकांनी गावात येऊ दिले नाही.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे भगवी कपडे घालून धडाधड खोटे बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्रिजभूषण सिंह याने महिला पैलवानांचे लैंगिक शोषण केले त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला त्यावर योगी गप्प का आहेत? चीनने केलेल्या घुसखोरीवर ते का बोलत नाहीत? असा सवाल पटोले यांनी केला. सहा महिन्यात पिओकेचे भारतात विलीनीकरण करण्याच्या गप्पा मारणा-या योगींनी १० वर्षात ते का करता आले नाही ते सांगितले पाहिजे. असं पटोले म्हणाले.
योगी आणि भाजपच्या नेत्यांकडे जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर शेतकऱ्यांच्या समस्यांवर सांगण्यासारखे काहीही नाही. देशात बोकाळलेला भ्रष्टाचार, तानाशाह व्यवस्था, केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर, बेरोजगारी, शेतकऱ्यांवरील अन्याय यावर ना देशाचे पंतप्रधान बोलले, ना राज्याचे मुख्यमंत्री. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविरोधात प्रचंड चीड आहे. ही चीड आता मतातून व्यक्त होईल. असं पटोले म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात आम्हाला रस नाही. हुकूमशाही वृत्तीच्या भाजपला सत्तेतून बाहेर काढणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे काम भाजपने केलंय. यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र पुनर्स्थापित करण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट असल्याचे नाना पटोले म्हणाले.
Web Title: Why is yogi adityanath not speaking on brijbhushan singh question by nana patole nrdm