सौजन्य - नवराष्ट्र टीम
सोलापूर शहरातील अनेक भागांत अद्याप सात ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी प्रचंड वाढली असताना महापालिका प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केला. रिकाम्या घागरी हातात घेऊन महिलांनी घोषणाबाजी करत महापालिकेकडे मोर्चा वळवला. “पाणी द्या, पाणी द्या; नाहीतर खुर्च्या खाली करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
दरम्यान, महापालिकेच्या सभागृहात १४०० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेवर सादरीकरण आणि चर्चा सुरू असतानाच बाहेर नागरिकांचा आक्रोश उसळल्याचे चित्र दिसून आले. एका बाजूला कोट्यवधींच्या योजनांवर चर्चा, तर दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी महिलांची धावपळ, असा विरोधाभास प्रकर्षाने समोर आला. या मोर्चात सत्ताधारी भाजप नगरसेवकांनीही सहभाग घेत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
“प्रभागात गेली आठ-दहा दिवस पाणी नाही. यासंदर्भात झोन अधिकाऱ्यांना आणि सार्वजनिक आरोग्य अभियंत्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे वैतागलेल्या महिलांनी महापालिकेवर घागर मोर्चा काढला.”
पुणे शहरावर पाणीटंचाईचे सावट?
हवामान खात्याने अल निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे यंदा मान्सून कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याने राज्य शासनाने पिण्याच्या पाण्याच्या काटेकोर नियोजनाचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील जलसंपदा व पाटबंधारे विभागाने अंमलबजावणी सुरू केली असून, यंदा प्रथमच धरणातील पाणीसाठा जूनऐवजी थेट ३१ ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार प्रमुख धरणांमधील पाण्याचे नियोजन अधिक काटेकोरपणे केले जात आहे. वाढती लोकसंख्या, तसेच स्थलांतरित नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील पिण्याच्या पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध साठ्याचा योग्य वापर आणि दीर्घकालीन नियोजन आवश्यक बनले आहे.






