ठाण्यामध्ये आठ लाखांची ऑनलाईन गुंतवणूक फसवणूक; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल (Photo Credit - X)
Online Investment Fraud: ठाणे परिसरात वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली ऑनलाईन गुंतवणुकीचे आमिष दाखवत एका गृहिणीची तब्बल आठ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिघांविरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने पुन्हा एकदा ऑनलाइन फसवणुकीचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तक्रारदार गृहिणीच्या मोबाईलवर १ ते ८ जानेवारी २०२६ या कालावधीत इंस्टाग्रामवर वर्क फ्रॉम होमची जाहिरात दिसून आली. या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर शिलपीता नावाच्या अनोळखी महिलेने व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधत टेलिग्राम अॅपवर जॉइन होण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांना सायली कांबळे आणि विक्रम सिंगट या टेलिग्राम अकाउंटशी जोडण्यात आले. या दोघांनी हॉटेल्सचे रिव्ह्यू देणे तसेच शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली काम देण्यास सुरुवात केली.
हे देखील वाचा: KDMC Politics: आकडे बोलतात! केडीएमसीत खरा बॉस भाजपाच, स्ट्राईक रेटमध्ये सर्वात सरस
गुंतवणुकीसाठी एक लिंक पाठवून संबंधित वेबसाईटवर पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करण्यात आले. सुरुवातीला नफा होत असल्याचे दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. सायली कांबळे हिने दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये वेळोवेळी पैसे ट्रान्सफर करत तक्रारदाराने एकूण ७ लाख ९५ हजार रुपये गुंतवले. फसवणूक झाल्याची घटना उघडकीस येताच वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
वेबसाईटवर ११ लाख ५२ हजार ४५० रुपयांचा नफा झाल्याचे दाखवण्यात आले. मात्र, नफा काढण्याचा प्रयत्न केला असता वेगवेगळी कारणे देत पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. उलट आणखी सहा लाख रुपये गुंतवण्याचा दबाव टाकण्यात आला. यामुळे फसवणुकीचा संशय बळावल्याने तक्रारदाराने सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात सायली कांबळे, विक्रम सिंगट आणि शिलपीता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण यांच्या माने मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर अशा ऑनलाइन फसवणुकींपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हे देखील वाचा: “मुंब्र्याला हिरवं करायचं आहे…”; AIMIM नगरसेविका Sahar Sheikh अडचणीत, पोलिसांनी बजावली नोटीस






