File Photo : Zika virus
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक साथीचे रोग बळावताना दिसत आहेत. त्यात डेंग्यू, चिकनगुनिया यांसारखे आजार उद्भवत असतानाच आता झिका या नव्या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या पुण्यात झिकाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून, रुग्णसंख्या 47 वर गेली आहे.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहरासह आजूबाजूच्या परिसरात पाणी साचले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. यामध्ये डेंग्यू, मलेरिया या साथीचे आजार होत आहेत. तसेच सध्या पुण्यात झिका व्हायरसने बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, ही संख्या आता 47 झाली आहे. त्यामुळे पुणेकरांनी यापासून दूर राहण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
झिका व्हायरसची लक्षणे तशी सामान्य आहेत. त्यामध्ये पुरळ येणे, ताप येणे, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागात दाह, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थ वाटणे यांसह डोकेदुखी अशी सामान्य लक्षणे आहेत. जर तुम्हाला ही लक्षणे जाणवत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन याचे निदान करून घ्यावे.
घराच्या आसपास स्वच्छता राखा
नागरिकांनी झिका विषाणूपासून दूर राहण्यासाठी उपाययोजना करून घ्याव्यात असेही सांगण्यात आले आहे. मच्छरांच्या वाढीला आळा घालण्यासाठी घरात आणि घराच्या आसपास स्वच्छता राखावी. मच्छरदाणी वापरणे आणि मच्छरांच्या चाव्यापासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
केंद्राकडून सतर्कतेच्या सूचना
दरम्यान, केंद्र सरकारने झिका विषाणूच्या केसेसबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, राज्य सरकारांनी तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. जनतेनेही सावधगिरी बाळगून आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.