फोटो सौजन्य: सोशल मीडिया
‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून अवघ्या इंडस्ट्रीमध्ये फेमस असलेला अभिनेता आमिर खान गेल्या ३ ते ४ वर्षांपासून पडद्यावरुन गायब आहे. २०२२ साली त्याचा ‘लाल सिंह चड्डा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला, तेव्हापासून अभिनेता गायबच झाला. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या आमिरने नुकतंच एबीपी न्यूजच्या ‘इंडिया समिट २०२५’ कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमात अभिनेत्याने अनेक गोष्टींवर दिलखुलास चर्चा केली. काही दिवसांपूर्वी आमिरचा मुलगा जुनैद खानचा पहिला थिएट्रिकल ‘लव्हयापा’ नावाचा चित्रपट रिलीज झाला. पण तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानिमित्त आमिर खानने त्याचं मत व्यक्त केलं.
मुलाखतीत आपल्या मुलाच्या ‘लव्हयापा’ चित्रपटाबद्दल बोलताना आमिर खान म्हणाला, “दुर्दैवाने तो चित्रपट थिएटरमध्ये चांगला चालला नाही. त्यामुळे मलाही त्याबद्दल खूप वाईट वाटतंय. मला वाटतं की ‘लव्हयापा’ चित्रपट चांगला होता. शिवाय, जुनैदनेही चित्रपटात चांगलं काम केलं होतं. एक बाप म्हणून चित्रपटाच्या रिलीजपूर्वी मी काळजीत होतो. त्या भावनांना मी इथे शब्दात मांडू शकत नाही. सध्या जुनैद एका सिनेमाचं शूटिंग करतोय जो नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये रिलीज होईल. तो एक रोमँटिक सिनेमा आहे.” अशा मोजक्या शब्दांमध्ये आमिरने त्याची प्रतिक्रिया दिली.
आमिर खानने जुनैदच्या फिल्मी कारकिर्दीतील आगामी चित्रपटाबद्दलही सांगितले. तो म्हणाला की, मी जुनैदसोबत आधीच दुसरा चित्रपट बनवला आहे. तो चित्रपट २०२५ च्या शेवटी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. म्हणजेच, तो चित्रपट नोव्हेंबर किंवा डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. त्या चित्रपटात जुनैद खान टॉलिवूड अभिनेत्री साई पल्लवीसोबत दिसणार असल्याचे आमिरने सांगितले. या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना एक अद्भुत प्रेमकथा पाहायला मिळेल असा आमिरचा विश्वास आहे.