सौजन्य- सोशल मीडिया
सध्या बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री २’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. चित्रपट रिलीज होऊन लवकरच दोन आठवडे होतील. चित्रपट हा भारतासह जगभरात स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर रिलीज झाला होता. नुकतंच अभिनेता अभिषेक बॅनर्जीने चित्रपट हिटच्या बाबतीत नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपट हिट ठरल्याचे श्रेय अभिनेत्री श्रद्धा कपूरलाच दिले जाते, असे म्हणत दबक्या आवाजात आपली नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी अभिनेता अपारशक्ती खुरानाने ही यावर भाष्य केले होते.
चित्रपट एकीकडे बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत असताना कलाकारांमध्ये मात्र चित्रपट हिट ठरल्याचे सर्वाधिक श्रेय कोणाला द्यायचे यात आपआपसात वाद सुरू असल्याचे दिसत आहे. नुकतंच अभिनेता अभिषेक बॅनर्जीने एक मुलाखत दिली. त्यात तो म्हणाला, “मला पीआर स्ट्रेटेजी काही समजत नाही, सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चाही मला काही समजत नाहीये. जेव्हा कोणतीही गोष्ट हीट होते, त्यावेळी त्यातल्या अनेक नकारात्मक गोष्टीही समोर येतात. पण त्याकडे अनेक जणं लक्ष देत नाहीत.”
मुलाखतीत पुढे अभिषेकने सांगितले की, “जेव्हा आम्ही फिल्मचं काम सुरु केलं होतं, त्यावेळी कोणीही हा चित्रपट तुझा आहे की माझा आहे, असं बोललं नव्हतो. तुम्ही स्वत: पाहिलं असेल किंवा अनेकदा पाहिलंही असेल की, ‘जना’च्या एन्ट्रीवर सर्वाधिक टाळ्यांचा कडकटाड आणि शिट्टीचा वर्षाव होतो. इतक्या मोठ्या सेलिब्रिटींमध्ये ‘जना’ आहे तरी कोण ? चित्रपटात कलाकारांची फार मोठी फळी आहे. हा चित्रपट एकट्आ कोणाचा नाही, हिच तर चित्रपटाची खासियत आहे. हा चित्रपट दिग्दर्शक अमर कौशिक यांचा आहे. तुम्ही कितीही वाद घाला, पण हा विषय वाद घालण्यासारखा नाही. दिग्दर्शकच जहाजाचा कॅप्टन असतो. त्याच्यामुळेच तर चित्रपट चांगला दिसतो. कारण तो संपूर्ण चित्रपटाच्या टीमला जोडून ठेवतो. ‘स्त्री २’ कोणत्या एकटाचा चित्रपट नाही तर तो सर्वांचा चित्रपट आहे. प्रत्येकाच्या मेहनतीतून हा चित्रपट बनला आहे. त्यामुळे वाद घालायचा प्रश्नच येत नाही.”