(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
बॉलीवूडची “धक-धक” गर्ल माधुरी दीक्षितने १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेनेशी लग्न केल्यानंतर अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. जवळजवळ एक दशक अमेरिकेत तिचे स्वप्नवत जीवन जगल्यानंतर, माधुरी भारतात परतली. अलीकडेच माधुरीने तिच्या निर्णयामागील कारण उघड केले. रणवीर अलाहबादियाच्या यूट्यूब चॅनलवरील एका नवीन संभाषणात, “दिल तो पागल है” अभिनेत्रीने अमेरिकेतील तिच्या शांत जीवनाबद्दल आणि तिच्या परतण्यामागील भावनिक कारणांबद्दल उघडपणे सांगितले.
अमेरिकेतील तिच्या आयुष्याबद्दल विचारले असता,तिने सांगितले, “अमेरिकेत मी खूप आनंदात राहत होते. तिथे शांत वातावरण असायचं… आम्ही कुटुंब म्हणून खूप मजा करायचो. मी माझ्या मुलांसोबत प्रत्येक क्षण घालवला.त्यांना गार्डनमध्ये घेऊन जायचे, त्यांच्यासोबत खेळायचे. भारतात परतण्याचा निर्णय आम्ही दोघांनीही (मी आणि माझे पती) खूप विचार करून आणि पूर्ण जाणीवपूर्वक घेतला”
माधुरीसाठी, हा काळ स्वप्नासारखा अध्याय बनला जिथे तिने मातृत्वाचा पूर्ण आनंद घेतला. भारतात परतण्याचा निर्णय अचानक घेतला गेला नव्हता. माधुरीने स्पष्ट केले की त्यामागे अनेक भावनिक कारणे होती, विशेषतः तिच्या पालकांशी संबंधित. अनेक गोष्टी एकत्र आल्या. माझे आई-बाबा माझ्यासोबत अमेरिकेत राहत होते. त्यांचं वय वाढत होतं आणि त्यांना भारतात परत यायचं होतं. मला त्यांना एकटे इथे पाठवायचं नव्हतं, कारण आमचे सगळे नातेवाईक आणि चुलत भावंडे अमेरिकेतच होती. माझ्या करिअरभर आई-बाबांनी मला खूप साथ दिली, त्यामुळे त्यांना एकटं सोडणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. माझ्या मुलांना आपली संस्कृती समजावी, हेही मला महत्त्वाचं वाटलं”
तिच्या परत येण्याचे ”आणखी एक प्रमुख कारण म्हणजे माझे काम येथे होते.शूटिंगचं जे शेड्यूल असेल ते पूर्ण करून मला पुन्हा अमेरिकेत जायचं असायचं. आणि परत नवे काम असेल तर पुन्हा भारतात यावं लागायचं. भारत-अमेरिका हा वारंवारचा प्रवास खूप थकवणारा होता आणि त्यात माझा खूप वेळही जात होता. त्यामुळे राम आणि मी दोघांनीही शांतपणे सर्व गोष्टींचा विचार केला. त्यांचंही भारतात बरंच काम होतं… त्यामुळे आम्ही इथे परतण्याचा निर्णय घेतला. माझ्या खूप मैत्रिणीही भारतात आहेत, त्यामुळे अमेरिकेत असताना मला भारताची सतत आठवण येत असे..” असे माधुरी दीक्षितने सांगितले.






