(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
२५ डिसेंबर, गुरुवारी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागली, सकाळी १० वाजेच्या सुमारास सोरेंटो टॉवरच्या मधल्या काही मजल्यांवरून धूर निघू लागला. पाहता पाहता आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि १२ व्या, १३ व्या व १४ व्या मजल्याला आपल्या विळख्यात घेतलं. आगीमुळे इमारतीतील इलेक्ट्रिकल डक्ट आणि केबल्स जळून खाक झाल्या, ज्यामुळं संपूर्ण इमारतीत धुराचे साम्राज्य पसरलं होतं. परंतु आता संदीप सिंग सुरक्षित आहेत आणि अंकिता लोखंडे-विकी जैन यांनी त्यांना मदत केली आहे.
संदीप सिंग हे “मेरी कोम”, “सरबजीत”, “अलिगढ”, “झुंड”, “स्वतंत्र वीर सावरकर”, “सफेद” आणि “छत्रपती शिवाजी महाराज” यासह अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. हर्नियामुळे कोकिलाबेन रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते नुकतेच घरी परतले होते. त्यांच्या आगमनानंतर काही वेळातच आग लागली. परंतु, ते सुरक्षित आहेत. त्यांचे काही फोटो ऑनलाइन शेअर केले जात आहेत.
१४ व्या मजल्यावर लागली भीषण आग
असे वृत्त आहे की २५ डिसेंबर रोजी सकाळी अंधेरी पश्चिमेतील २३ मजली निवासी इमारतीच्या १४ व्या मजल्यावर आग लागली. त्यामुळे प्रचंड धूर झाला, जो वरच्या मजल्यापर्यंत पसरला आणि अनेक रहिवासी अडकले. परंतु, नंतर शिडी वापरून ४० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मुंबई अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आपत्कालीन पथकांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी त्वरित कारवाई करण्यात आली. ईटाइम्सशी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की अडकलेल्या सर्व रहिवाशांना कोणतीही दुखापत न होता बाहेर काढण्यात आले. आग १४ व्या मजल्यापर्यंत मर्यादित होती.
निर्माता संदीप सिंग सुरक्षित आहेत
या घटनेत संदीप सिंग सुरक्षित असल्याची बातमी ऐकून त्यांचे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांना दिलासा मिळाला. संदीप सिंग यांची चित्रपटसृष्टीत दीर्घ आणि यशस्वी कारकीर्द आहे. त्यांनी पत्रकारितेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर ते भन्साळी प्रॉडक्शनचा भाग बनले. त्यानंतर त्यांनी स्वतःची निर्मिती कंपनी, लेजेंड स्टुडिओजची स्थापना केली. “मेरी कोम” मधील प्रियांका चोप्राच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली, तर “सरबजीत” आणि “अलिगढ” सारख्या चित्रपटांनी सामाजिक मुद्द्यांवर खोलवर प्रभाव पाडला. त्यांचे कठोर परिश्रम आणि इतिहासाबद्दलची संवेदनशीलता “झुंड” आणि “स्वतंत्र वीर सावरकर” सारख्या चित्रपटांमध्ये दिसून येते.






