(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
हेमा मालिनी यांच्या बायोपिकमध्ये दीपिका पदुकोण योग्य निवड ठरेल का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना हेमा मालिनी म्हणाल्या, “तिची इच्छा असेल तर ती हे करू शकते. कोणीही ही भूमिका साकारू शकतं. दीपिका एक सुंदर आणि प्रतिभावान मुलगी आहे.”
हेमा मालिनी आणि दीपिका पदुकोण यांच्यात जुना संबंध आहे. विशेष म्हणजे, २०१५ मध्ये हेमा मालिनी यांनी त्यांच्या चरित्र पुस्तक ‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ च्या प्रकाशनासाठी दीपिका पदुकोणची निवड केली होती. त्यामुळे दोघींमधील खास नातं अनेकदा चर्चेत राहिलं आहे.
दीपिकाच्या बॉलिवूड पदार्पणातील ‘ओम शांती ओम’ या चित्रपटाचाही हेमा मालिनी यांच्याशी खास संबंध आहे. या चित्रपटातील ‘शांतीप्रिया’ हे पात्र ७० आणि ८० च्या दशकातील हेमा मालिनी यांच्या ‘ड्रीम गर्ल’ या लोकप्रिय प्रतिमेपासून प्रेरित असल्याचं मानलं जातं.
दरम्यान, हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर आपल्या ६० वर्षांच्या चित्रपट प्रवासाबद्दलही भावना व्यक्त केल्या. त्यांनी या खास सोहळ्याचे वर्णन अविस्मरणीय असल्याचं सांगत चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले.
हेमा मालिनी यांनी १९६८ मध्ये ‘सपनों का सौदागर’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘ड्रीम गर्ल’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘द बर्निंग ट्रेन’, ‘जुगनू’ आणि ‘बागबान’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली.
आजही हेमा मालिनी यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिष्ठित अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं आणि त्यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकची कल्पना चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे.






