(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Aamir Khan’s third wedding: बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा काही दिवसांपूर्वी तिसरी विवाहसोहळा पार पडला. आमिरने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत तिसरं लग्न केलं.त्यांच्या लग्नाचे व्हिडिओ फोटो व्हायरल होत आहेत आणि चर्चा देखील होत आहे. अशातच आता अभिनेते शेखर सुमन यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर भाष्य करत टोमणा मारला आहे.
शेखर सुमन यांचा ‘शेखर Tonite’ हा शो प्रचंड लोकप्रिय आहे. या शोने अल्पावधीतच नवनवीन विक्रम मोडले आहेत. शेखर सुमन सहसा आपल्या विनोदातून सत्ताधारी सरकारसह राजकीय आणि इतर विषयांवर भाष्य करतात, पण यावेळी त्यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर भाष्य केले. ६१ वर्षीय आमिर खानने नुकतेच तिसरे लग्न केले आहे. शेखर सुमन यांनी ‘शेखर Tonite’वर याच कार्यक्रमात आमिर खानच्या लग्नाचा संदर्भ देत राजकीय घडामोंडीवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, सत्ताधारी राजकारण्यांनी आमिर खानकडून नवीन आणि जुन्या दोन्ही पक्षांचा समावेश असलेल्या आघाड्या कशा सांभाळाव्यात हे शिकले पाहिजे. त्यांनी मिश्किलपणे म्हटले की, जिथे राजकीय पक्ष ‘डबल-इंजिन सरकार’ चालवू शकत नाहीत, तिथे आमिर खान ‘ट्रिपल-इंजिन सरकार’ चालवत आहे, आणि तेही अगदी अचूकपणे.
शेखर सुमन म्हणाले की, आमिर खानने येणाऱ्या पिढ्यांना एक अनोखी दृष्टी दिली आहे. आणि ती दृष्टी म्हणजे, एखादे ध्येय साध्य होईपर्यंत त्यासाठी चिकाटीने प्रयत्न करत राहणे. शेखर सुमन यांनी म्हटले की, आमिर खान कोणतीही गोष्ट परिपूर्ण होईपर्यंत त्यावर काम करत राहतो.
अभिनेत्याच्या तीन लग्नांचा संदर्भ देत त्यांनी त्यांची तुलना इंजिन आणि डब्याशी केली. ते म्हणाले, “असे म्हटले जाते की राजकारण्यांना आघाड्यांची चांगली जाण असते. पण त्यांनी या गृहस्थाकडून योग्य आघाड्यांचा सल्ला घ्यायला हवा. त्यांनी पहिली आघाडी केली आणि ती तुटली. त्यांनी दुसरी आघाडी केली आणि तीही दुर्दैवाने तुटली. आता त्यांनी तिसरी आघाडी केली आहे. मला वाटते की याला आता आघाडी न म्हणता महाआघाडी म्हटले पाहिजे. बघा, पक्ष डबल-इंजिन सरकार चालवू शकत नाहीत आणि ते ट्रिपल-इंजिन सरकार चालवत आहेत.”
शेखर सुमन पुढे म्हणाले, “आणि या विलक्षण माणसाचं नाव आहे… एक मिनिट थांब, गौरी… तुझ्या लक्षात आलं असेल की, जेव्हा आपण ट्रेनने प्रवास करायचो, तेव्हा एका ठराविक अंतरावर, एका विशिष्ट स्टेशनवर, इंजिन ड्रायव्हर एक बोगी बाजूला काढून दुसरी जोडायचा. मग, पुढे जाऊन तो दुसरी बोगी बाजूला काढून तिसरी जोडायचा. आणि थोडं पुढे जाऊन, तो बाजूला काढलेल्या पहिल्या दोन बोगी तिसऱ्या बोगीला जोडायचा. आणि अशाप्रकारे, एक संपूर्ण, लांब ट्रेन तयार व्हायची. हा तोच इंजिन ड्रायव्हर आहे ज्याचं कौशल्य अतुलनीय आहे. तो अद्वितीय, विलक्षण आणि आश्चर्यकारक आहे. कल्पना करा की हे एक असं इंजिन आहे जे पेट्रोल, इथेनॉल आणि आयसोब्युटेनॉल एकत्र करून बनवलं आहे. तरीही, हे इंजिन कधीही बंद पडलं नाही, आणि नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आपल्या रुळांवर धावत आहे. त्यांचं नाव आहे मिस्टर आमिर खान. अभिनंदन, आमिर खानने तिसऱ्यांदा यशस्वी लग्न केलं आहे.”
यापुढे शेखर सुमन यांनी आपल्या खास विनोदी शैलीत आमिर खानवर आणखी टोलेबाजी केली. ते म्हणाले, “इतर कोणाचे ‘अच्छे दिन’ येवोत वा न येवोत, पण खान साहेबांचे मात्र सलग तिसऱ्यांदा अच्छे दिन आले आहेत. आमिर खानने पूर्ण बहुमताने तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं आहे.”
यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही मिश्किल उल्लेख करत शेखर म्हणाले, “आता तर मोदीजीही विचारात पडले असतील. ते म्हणत असतील, ‘मी नुकताच नेहरूंचा विक्रम मोडला आणि हा आमिर कुठून आला?’ “अशा प्रकारे शेखर सुमन यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची फिरकी घेतली.






