(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने त्यांचे कुटुंब, चित्रपट उद्योग आणि त्यांच्या चाहत्यांना दुःख झाले आहे. या सगळ्यांना त्यांच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. ८ डिसेंबर १९३५ मध्ये त्यांचा जन्म झाला. काल अभिनेत्याचा ९० वा वाढदिवस होता, ‘ही- मॅन’ यांच्या या खास दिवसानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आणि अनेक उद्योगातील मान्यवरांनी त्यांना आठवून त्यांचे स्मरण केले. धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांचे चित्रपट आणि त्यांचा अभिनय नेहमीच चाहत्यांच्या मनात जिवंत राहणार आहे.
बिग बॉस १९ च्या ग्रँड फिनाले दरम्यान, धर्मेंद्र यांची आठवण काढताना सलमान खान देखील भावूक होताना दिसला. स्टेजवर त्यांचे डोळे पाणावले होते. मुंबईतील जुहू येथील इस्कॉन मंदिरात धर्मेंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार संजय निरुपम यांनीही उपस्थिती लावली आणि दिवंगत अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी उपस्थित झालेले लोक भावुक झाले.
लाखो हृदयांवर राज्य करणारा अभिनेता
आयएएनएसशी बोलताना संजय निरुपम यावेळी म्हणाले, “संपूर्ण देश धरमजींची आठवण काढत आहे. काही आठवड्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले. ते एक महान आणि हुशार कलाकार होते. लाखो हृदयांवर राज्य करणाऱ्या धरमजींच्या आठवणीसाठी त्यांच्या गाण्यांची ही संगीत रात्र आयोजित करण्यात आली आहे.” मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ते जिथे असतील तिथे आनंदी राहोत.” असे ते म्हणाले.
धर्मेंद्र यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कुटुंबानेही भावनिक पोस्ट लिहिली. हेमा मालिनीपासून ते सनी देओल, बॉबी देओल, ईशा देओल आणि नातू करण देओलपर्यंत, सर्वांनाच पोस्टद्वारे दिवंगत अभिनेत्याची आठवण आली.
धर्मेंद्र हे दिलीप कुमार यांचे चाहते होते
धर्मेंद्र यांनी त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. परंतु, त्यावेळी चित्रपटांमध्ये प्रवेश करणे त्यांच्यासाठी सोपे काम नव्हते. धर्मेंद्र हे अभिनेते दिलीप कुमार यांचे खूप मोठे चाहते होते आणि त्यांना पाहून त्यांनी चित्रपटांमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. सायरा बानू यांनी एका पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे.
धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ‘या’ वर्षी होणार प्रदर्शित
धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ हा आहे. हा चित्रपट श्रीराम राघवन दिग्दर्शित आणि मॅडॉक फिल्म्स आणि दिनेश विजन निर्मित आहे. या चित्रपटात धर्मेंद्र यांनी ब्रिगेडियर एम.एल. खेत्रपाल यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ‘इक्कीस’ चित्रपट हा येत्या २५ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जो पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत.






