फोटो सौजन्य - Social Media
राशी छाब्रिया (वय 47) असे आरोपी महिलेचे नाव असून तिला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. ती रविना टंडन यांच्या आई वीणा टंडन यांची केअरटेकर म्हणून काम करत होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, राशी 2020 पासून त्यांच्या संपर्कात होती. वैयक्तिक अडचणींनंतर ती कुटुंबाच्या अधिक जवळ आली आणि कालांतराने तिने सर्वांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे तिला घरात मुक्तपणे वावरण्याची परवानगी देण्यात आली होती.
ऑक्टोबर 2025 मध्ये कुटुंबीयांनी घरातील तिजोरीची तपासणी केली असता ती उघडलेली आढळली. त्यामधील सोन्या-हिऱ्यांचे दागिने तसेच दोन महागडी मनगटी घड्याळे गायब असल्याचे लक्षात आले. या प्रकरणी संशय आल्यानंतर कुटुंबीयांनी चौकशी सुरू केली. तक्रारदार राजीव टंडन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला राशी छाब्रियाने सर्व आरोप फेटाळले. मात्र पुढील चौकशीदरम्यान तिने चोरीची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने चोरीतील दोन घड्याळे परत केली आहेत. मात्र दागिने तिने जगदीश नावाच्या एका परिचिताकडे दिल्याचे सांगितले. दागिने परत मिळवून देण्याचे आश्वासनही तिने कुटुंबीयांना दिले होते. तथापि, अद्याप सर्व दागिने हस्तगत झाले नसून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
या प्रकरणाला आणखी एक गंभीर वळण मिळाले आहे. राजीव टंडन यांनी आरोप केला आहे की, आरोपी महिलेच्या एका साथीदाराने स्वतःला पोलिसांचा माहितीदार असल्याचे सांगत त्यांना धमकावले. दागिने परत मागण्याचा आग्रह धरल्यास खोट्या अमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जुहू पोलिसांनी 21 मे रोजी राशी छाब्रियाला अटक केली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने तिला पोलिस कोठडी सुनावली होती. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून चोरी गेलेल्या दागिन्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच आरोपीच्या इतर साथीदारांचा सहभाग होता का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.






