पुणे शहरात पावसाची हजेरी (फोटो- istockphoto)
पुणेकरांना पुढील दोन दिवसांत काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे
राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज
राज्यातील विविध भागांसाठी यलो अलर्ट जारी
पुणे: गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना पुढील दोन दिवसांत काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुणे शहरासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. राज्यातील विविध भागांसाठी पुढील दोन ते तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मंगळवारी (ता. २) पुण्यात कमाल ३८ अंश सेल्सिअस, तर किमान २४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसभर कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांना ऊन-सावलीचा अनुभव आला. पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता असून दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजपासून पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. कोकणात सिंधुदुर्ग वगळता उष्ण व दमट वातावरण कायम राहणार असून दुपारी किंवा सायंकाळी काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरेकडील सीमा अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि ईशान्य भारतातील भागांतून पुढे सरकत असून, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण अनुकूल असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागांत मॉन्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे.
बुधवारी (ता. ३) पुण्यात कमाल तापमान सुमारे ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील; मात्र दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Maharashtra Rain Alert: दोन दिवस छत्री घेऊनच फिरा; वादळी वारे अन्…; IMD ने दिला ‘हा’ इशारा
पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस हवामान मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असून दुपारनंतर किंवा सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ होऊ शकते. रविवारी शहरात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सोमवारी कमाल तापमान ३७ अंशांवर स्थिर राहण्याची, तर किमान तापमान २५ अंशांपर्यंत किंचित घटण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.






