(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
गायिका पूर्णिमा पटवर्धन यांचे नवे ओरिजिनल गाणे ‘नाचना’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, टी-सीरिजच्या पॉप चार्टबस्टर्स अंतर्गत प्रदर्शित झालेल्या या गाण्याला चित्रपट व संगीत क्षेत्रातील मान्यवरांकडून मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळत आहे. या गाण्यामुळे पूर्णिमा पटवर्धन यांच्या स्वतंत्र संगीत प्रवासातील एक महत्त्वाचा आणि आशादायक टप्पा अधोरेखित होत आहे.
प्रदर्शनानंतर ‘नाचना’ने आपल्या ऊर्जावान पॉप धाटणीच्या संगीतामुळे आणि कर्णमधुर ठेक्यांमुळे विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या गाण्याचे विशेष कौतुक होत असून, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि दिग्गज गायक सोनू निगम यांच्यासह अनेक नामवंत व्यक्तींनीही गाण्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे संगीतसृष्टीतूनही ‘नाचना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे.
आपल्या भावना व्यक्त करताना पूर्णिमा पटवर्धन म्हणाल्या,“‘नाचना’ला मिळणाऱ्या प्रेमाने आणि कौतुकाने मी मनापासून भारावून गेले आहे. अनुपम खेर, सोनू निगम आणि इतर अनेक मान्यवरांकडून मिळालेला पाठिंबा आणि प्रोत्साहन माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. या गाण्यावर विश्वास ठेवून मला साथ दिल्याबद्दल मी टी-सीरिजची मनापासून आभारी आहे. येत्या काळात अधिकाधिक प्रेक्षकांनी ‘नाचना’ पाहावे, त्याच्याशी जोडले जावे आणि त्याचा आनंद घ्यावा, अशी माझी इच्छा आहे.”
टी-सीरिजच्या पॉप चार्टबस्टर्स अंतर्गत प्रदर्शित झालेले ‘नाचना’ हे ताज्या आणि आधुनिक पॉप धाटणीचे गाणे असून, भारतातील स्वतंत्र संगीत विश्वात पूर्णिमाची वाढती ओळख ठळकपणे दर्शवते. उत्साही चाली आणि प्रभावी गायनाच्या जोरावर हे गाणे चित्रपटसंगीताच्या चौकटीबाहेरील ओरिजिनल संगीत आवडणाऱ्या श्रोत्यांना विशेष भावत आहे.
कॅनडाहून परतलेल्या पूर्णिमा पटवर्धन आपल्या संगीतामध्ये आंतरराष्ट्रीय कलात्मक अनुभव आणि भारतीय सांस्कृतिक वारसा यांचे अनोखे मिश्रण घेऊन आल्या आहेत. त्या प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री यांच्या भगिनी असून, ‘मैने प्यार किया’ या गाजलेल्या चित्रपटातून भाग्यश्री ओळखल्या जातात. पूर्णिमांनी मनोरंजन क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात बालकलाकार म्हणून ‘हम तो चले परदेस’ या चित्रपटातून केली आणि पुढे मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचून आपली बहुआयामी प्रतिभा सिद्ध केली.
सांगलीच्या राजघराण्यातील पूर्णिमा समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा वारसा लाभलेली व्यक्तिमत्त्व आहेत.आधुनिक कलात्मक जाणिवांसोबत ही परंपरा त्यांना विविध पिढ्यांतील प्रेक्षकांशी जोडण्यास मदत करते आणि त्यांच्या संगीताला एक वेगळी ओळख देते.
‘नाचना’ला मिळणाऱ्या सातत्यपूर्ण प्रशंसेमुळे पूर्णिमा पटवर्धन स्वतंत्र पॉप कलाकार म्हणून स्वतःची वेगळी जागा निर्माण करत आहेत. हे गाणे यूट्यूब तसेच इतर डिजिटल माध्यमांवर ऐकण्यासाठी उपलब्ध आहे.






