(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
फॅशन आणि तिच्या अभिनय कौशल्याने कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे. काही दिवसांपूर्वी संस्कृतीच्या पहिल्या वहिल्या इंग्रजी चित्रपट “करेज” सँटो डोम्निगो यूएसएला फिल्म फेस्टीवल मध्ये स्क्रिनिंग पार पडलं आणि या चित्रपटाने प्रेक्षकांना मोहित केलं आता हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत येऊन वॉर्नर ब्रदर्स स्टूडियो मध्ये करेजच खास स्क्रिनिंग पार पडले आहे. करेज मधल्या तिच्या अभिनयाचं साता समुद्रापार कौतुक होत आहे ही गोष्ट नक्कीच अभिमानास्पद आहे. संस्कृती कायम वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करताना दिसते आणि ती एक उत्तम कलाकार आहे हे ती वारंवार तिने सिद्ध करून दाखवले आहे. संस्कृती पहिली मराठी अभिनेत्री आहे जिच्या चित्रपटाचं वॉर्नर ब्रदर्स स्टूडियो मध्ये स्क्रिनिंग तर झालं पण त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला आहे.
धुळ्याच्या मृणाल ठाकूरचं आरस्पानी सौंदर्य; नेटकऱ्यांचं जिंकलं मन
संस्कृती वॉर्नर ब्रदर्स स्क्रिनिंगचा खास अनुभव शेअर करताना अभिनेत्री म्हणाली की, “करेज चित्रपटाला प्रेक्षकांचं मिळणार प्रेम हे शब्दात व्यक्त करता येत नाही पण वॉर्नर ब्रदर्स स्टूडियो आमच्या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग होणं आम्ही तिकडे जाणं हा अनुभव खूप कमालीचा आहे. कधीच वाटलं नव्हत हा चित्रपट वॉर्नर ब्रदर्स स्टूडियो मध्ये जाईन त्याचं खास स्क्रिनिंग होईल आणि मला तिकडे जायला मिळेल हा सगळा एक सोहळा आमच्यासाठी नक्कीच खूप खास आहे आणि तितकाच लक्षात देखील राहणारा आहे. करेज सारख्या चित्रपटाचा प्रीमियर वॉर्नर ब्रदर्स स्टूडियो मध्ये होणं हे स्वप्नवत होत.” असे अभिनेत्री म्हणाली आहे.
तसेच अभिनेत्री पुढे म्हणाली की, ‘हॉलिवूड चित्रपटाच फाऊंडेशन असलेल्या वॉर्नर ब्रदर्स स्टूडियो मध्ये जाऊन हा सोहळा अनुभवायला मिळणं भाग्याचं आहे. एक स्वप्नं या निमित्तानं पूर्ण तर झालं पण जाताना एक धाकधूक होती आणि नंतर प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद प्रतिक्रिया देखील तेवढ्याच विशेष होत्या. वॉर्नर ब्रदर्स स्टूडियोच्या स्क्रीन वर “संस्कृती बालगुडे” हे नाव बघून खूप भरून तर आल पण खूप भारी वाटलं आणि मी पहिली मराठी अभिनेत्री आहे जिच्या चित्रपटाचं इकडे स्क्रिनिंग झालं म्हणून ही गोष्ट अजून लक्षणीय ठरली. मराठी लोकांनी केलेल्या चित्रपटाच जगाच्या पाठीवर जाऊन कौतुक होतंय हे बघून खूप कमाल वाटतं आहे”. असे अभिनेत्री म्हणाली आहे.
एक मराठमोळी अभिनेत्री आणि तिच्या कलाकृतीला जगाच्या पाठीवर मिळणार प्रेम ही गोष्ट नक्कीच अभिमानास्पद आहे. संस्कृती तिच्या अभिनयाची जादू आजवर सगळ्यांनी अनुभवली आहे पण तिच्या या इंग्रजी चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपलेसे केलं आहे. जगभरात संस्कृतीच्या “करेज” या इंग्रजी चित्रपटाची चर्चा तर आहे पण येणाऱ्या काळात संस्कृती अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार आहे हे बघण देखील तितकच उत्कंठावर्धक ठरणार आहे.