फोटो सौजन्य - Social Media
बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका मुलाखतीत सुनीता यांनी गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक स्पष्ट वक्तव्ये केली. त्यांनी सांगितले की, तरुणपणी गोविंदा अत्यंत देखणा दिसायचा आणि त्यावेळी त्याचे नैसर्गिक केस होते. आता मात्र तो हेअर पॅच वापरतो. यामध्ये लाज वाटण्यासारखे काही नसून चित्रपटसृष्टीतील अनेक पुरुष आणि महिला कलाकार अशा प्रकारच्या पद्धतींचा वापर करतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुनीता यांनी गोविंदाच्या अभिनय कौशल्याचेही भरभरून कौतुक केले. “माझा नवरा एकमेवाद्वितीय आहे. त्याच्यासारखा कलाकार इंडस्ट्रीत कधी झाला नाही आणि पुन्हा होणारही नाही,” असे त्या म्हणाल्या. मात्र, वैवाहिक आयुष्याबाबत बोलताना त्यांनी वेगळी भूमिका मांडली. त्यांच्या मते, गोविंदा एक उत्तम मुलगा आणि भाऊ आहे, पण पती म्हणून त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत.
त्यांनी सांगितले की, त्यांना फिरणे, पार्ट्या, सुट्ट्या आणि एकत्र वेळ घालवणे आवडते, परंतु गोविंदाने संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी काम करण्यात घालवले आणि स्वतःसाठी जगण्याची संधी घेतली नाही. “मला गोविंदासारखा मुलगा हवा होता, पती नव्हे,” असे वक्तव्य करत त्यांनी त्यांच्या वैवाहिक नात्यातील काही खंतही व्यक्त केली.
गेल्या काही महिन्यांत सुनीता यांनी गोविंदावर विवाहबाह्य संबंधांचेही आरोप केले होते. यावर नुकतीच प्रतिक्रिया देताना गोविंदाने हे सर्व एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा दावा केला. शांत राहिल्याने लोक चुकीचा अर्थ काढत असल्यामुळे आता बोलणे आवश्यक वाटल्याचे त्यांनी म्हटले. तसेच आपल्या जवळच्या लोकांचाही नकळत गैरवापर केला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
1987 मध्ये विवाहबद्ध झालेल्या गोविंदा आणि सुनीता यांना टीना आणि यशवर्धन ही दोन मुले आहेत. टीना यापूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण करून अभिनय केला असून, यशवर्धनदेखील लवकरच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. सुनीता यांच्या ताज्या वक्तव्यांमुळे या दाम्पत्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.






