(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
छाया कदम यांनी 2024 वर्षात विविध भूमिका साकारल्या आणि त्या जागतिक स्तरावर जाऊन पोहचल्या आहेत. नुकताच त्यांचा ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ ला 82 व्या वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (मोशन पिक्चर) श्रेणीमध्ये नामांकन मिळालं आहे. आणि महत्त्वाची बाब अशी ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ एकूण दोन नामांकने मिळाली असून दुसरी एक सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चरसाठी मिळाले आहे. विशेष म्हणजे या श्रेणीमध्ये भारतीय दिग्दर्शकाचे नामांकन होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
छाया कदम यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’चा प्रीमियर 23 मे रोजी 2024 कान्स चित्रपट महोत्सवात झाला होता आणि तो आता चित्रपट गृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने प्रदर्शित होण्याआधीच अनेक पुरस्कार पटकावले आहेत आणि आता वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये नामांकन मिळवण्याचा बहुमान देखील पटकावला आहे. या बातमीने अभिनेत्रीला चांगलाच आनंद झाला आहे.
काही दिवसापूर्वी ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ या चित्रपटाला न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कलमध्ये (NYFCC) सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे आणि आता हा चित्रपट पुन्हा एक नवा पुरस्कार जिंकण्यासाठी सज्ज होताना दिसतो आहे.
या बद्दल उत्सुकता व्यक्त करताना छाया कदम म्हणाल्या, “ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’साठी मिळालेलं गोल्डन ग्लोब नामांकन हे माझ्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे. भारतीय सिनेमा जागतिक स्तरावर पोहोचतोय, याचा आनंद वाटतो. हा चित्रपट माझ्या हृदयाच्या जवळ आहे. तो मानवी भावना, संघर्ष आणि प्रकाशाच्या शोधाबद्दल आहे. माझ्या सहकाऱ्यांनी दिलेल्या अथक प्रयत्नांमुळे हे यश शक्य झालं. या नामांकनाने आम्हाला पुढे आणखी उत्तम कथा सांगण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. प्रेक्षकांनी दाखवलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मी मनःपूर्वक आभारी आहे.” असे अभिनेत्रीने सांगितले.
तीन महिन्यांची झाली रणवीर-दीपिकाची मुलगी दुआ, आजी अंजू भवनानीने दान केले स्वतःचे केस!
काय आहे या चित्रपटाची कथा?
चित्रपटाची कथा प्रभा आणि अनु या दोन परिचारिकांची आहे. दोघेही मलियाली असून मुंबईत राहतात. दोघेही आपापल्या नात्यात संघर्ष करताना या चित्रपटामध्ये दिसत आहे. त्याच्यासोबत तिसरी स्त्री देखील आहे तिचे नाव पार्वती आहे. संपूर्ण चित्रपटाची कथा यांच्याभोवती फिरते आहे. आजही समाजात स्त्रीची काय परिस्थिती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. आजही, ती आपले संपूर्ण आयुष्य इतरांची मदत आणि काळजी घेण्यात घालवते आणि त्या बदल्यात काहीही मिळत नाही हे या चित्रपटातून स्पष्ट केले आहे. हा चित्रपट स्त्रीवादी विचारसरणीला बळ देणारा आहे.
‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’मध्ये छाया कदम, कानू कुसरुती, दिव्या प्रभा आणि यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट फ्रान्समधील ‘पेटीट काओस’ आणि भारतातील ‘चॉक अँड चीज’ आणि ‘अनदर बर्थ’ यांची अधिकृत इंडो-फ्रेंच सहनिर्मिती आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना देखील खूप आवडला आहे.