त्यानंतर वैभवदीप नाट्य संस्था सोलापूर यांनी दीपक शिंदे यांनी लिहिलेली व दिग्दर्शन केलेली प्रेम की यातना ही एकांकिका सादर केली. एखादी व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यानंतर काही संवेदनशील, लहान मुलं खूप दुःखी होतात. हे प्रेम आहे की यातना… असा प्रश्न विचारणारी ही एकांकिका होती. त्यानंतर क्रिदय एंटरप्राइजेस पुणे या संघाने संकेत मोडक यांनी लिहिलेली व दिग्दर्शन केलेली ‘पहिली रात्र’ एकांकिका सादर केली. वयामध्ये आठ-दहा वर्षाचे अंतर असलेल्या म्हणजे एक प्रकारे दोन वेगळ्या पिढीतील लोकांचे लग्न होते. अशा जोडप्याच्या पहिल्या रात्री होणाऱ्या संवादातून जीवनावर विनोदी शैलीत भाष्य करणारी ही कथा होती.
दुसऱ्या सत्रात नक्षत्र थिएटर्स, सोलापूर संघाने योगेश सोमण लिखित व राजेश जाधव दिग्दर्शित ‘ साठा उत्तराची कहाणी’ एकांकिका सादर केली. नाना आणि नानी या वृद्ध जोडप्यामध्ये नाना अवयव दानाचे पुरस्कर्ते असतात, तर नानी अर्धांगवायूने आजारी असतात. अखेरच्या काळात अवयव दानासाठी नकार देणाऱ्या नानी मृत्यूपूर्वी फॉर्मवर सही करतात, अशी भावपूर्ण कथा यामध्ये होती. स्पर्धेतील शेवटची कुपन ही एकांकिका रंगयात्रा, इचलकरंजी या संधाने सादर केली. कादंबरी माळी यांनी लिहिलेल्या व अनिरुद्ध दांडेकर यांनी दिग्दर्शन केलेल्या या एकांकिकेत, एका गरीब कुटुंबाचा भूकेशी लढा सुरू असला तरी आमिषाला बळी न पडता है कुटुंब स्वाभिमान जपते असा चांगला आशय मांडण्यात आला होता.
नाट्यकला अकादमी, सातारा संघाने पंकज काळे लिखीत व दिग्दर्शित ‘फिल्टर नसलेले वास्तव’ एकांकिका सादर केली. सध्याच्या महाविद्यालयीन मुलीच्या आयुष्याभोवती फिरणाऱ्या या एकांकिकेत, सोशल मीडियावर वास्तव लपवून फक्त चकचकीत आयुष्य दाखविण्यापेक्षा ज्ञानाच्या योग्य दिशेने प्रवास करावा असा संदेश दिला. ‘हॉल तिकीट’ ही एकांकिका विना स्टुडिओ, कोल्हापूर संघाने सादर केली. सुरज नेवरेकर लिखीत व अर्जुन पिसाळ यांनी ही एकांकीका दिग्दर्शित केली होती. शेवटच्या सत्रात लो. टिळक वाचनालय बामणोली, सांगली संधाने आदिल नूरशेख लिखीत व श्रीनिवास जरंदीकर यांनी दिग्दर्शित केलेली ‘पाऊसपाड्या’ एकांकिका सादर केली. शब्दजा कोल्हापूर संघाने ओंकार वर्णे यांनी लिहिलेली ‘नकाब’ एकांकिका सादर केली.






